अमरावती - विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात उद्या हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान शास्त्र विभाग प्रमुख अनिल बंड यांनी वर्तवला आहे.
मागील २-३ दिवसापासून राजस्थान, पश्चिम मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये उष्णतेची लाट आहे. दरम्यान, अमरावती आणि विदर्भात पश्चिमेकडून वारे वाहत असल्याने येथील तापमान वाढले आहे. मागील आठवड्यात विदर्भातील अनेक जिल्ह्यातील तापमान हे ४४अंश सेल्शिअसच्या पुढे सरकले होते. तापमान वाढीमुळे अमरावती व पश्चिम विदर्भ ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टटा निर्माण झाला असून वातावरणात गारवा येण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे उद्या विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर या भागात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच तापमानातील उष्णतेची लाट उद्यापासून काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.