अमरावती : नागेश्वर शिवलिंग मंदिर अति प्राचिन मंदिर आहे. इथे अनेक भाविकांची श्रद्धा असणाऱ्या या जागृत शिवलिंगाला शंभर वर्षांपूर्वी नवस म्हणून 411 किलो वजनाची भली मोठी अष्टधातूची घंटी अर्पण करण्यात आली. आज या प्राचीन महादेव मंदिरासमोरच देशातील एकमेव महाकाय घंटीचे मंदिर देखील या परिसरात येणाऱ्या भाविकांना अक्षरशः चकित करणारे आहे.
मंदिराचे असे आहे पौराणिक महत्त्व : नागेश्वर शिवलिंग मंदिर हे अतिप्राचीन असून या ठिकाणी श्रीरामाचे गुरू वशिष्ठ मुनी यांनी या ठिकाणी तपश्चर्या केल्याचा उल्लेख पुराणात आहे. या मंदिरालगतच विदर्भाची पौराणिक नगरी कुंडीलपूर असून कुंडलपूरचे राजा भीष्मक हे नेहमीच या मंदिरात शिवलिंगाच्या दर्शनासाठी यायचे. रुक्मिणी माता देखील शिवलिंगाच्या दर्शनासाठी यायच्या. विशेष म्हणजे भगवान श्रीकृष्ण या परिसरात रुक्मिणी मातेचे हरण करण्यासाठी आले असताना ते या मंदिर परिसरात आले होते.
सूर्याचा प्रकाश थेट शिवलिंगावर : भगवान श्रीकृष्णाने देखील या शिवलिंगाचे दर्शन घेतले होते, अशी माहिती या मंदिरातील पुजारी जानराव भारस्कर यांनी 'ई टीव्ही भारत' शी बोलताना दिली. भारतात ज्या ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गेले त्या त्या ठिकाणी कदंबचे झाड आढळते. या मंदिराच्या परिसरात देखील वर्धा नदीच्या काठावर कादंबचे मोठे झाड असल्याचे देखील जानराव भारस्कर यांनी सांगितले. या मंदिराच्या खांबांवरील नक्षीकाम हे मंदिरात नेमके किती जुने असावे याची माहिती देतात. मंदिराचा घुमट, मंदिराचा ओटा हे सर्व काही पाहताना अतिशय भव्यता जाणवते. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर अशी खिडकी तयार करण्यात आली आहे. ज्यातून सूर्याचा प्रकाश थेट शिवलिंगावर पडतो. यासह मंदिराच्या चारही दिशेने मंदिरात पुरेसा प्रकाश येईल अशा खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
अशी आहे महाकाय घंटीची कहाणी : हे शिवलिंग जागृत असून या ठिकाणी मनोभावे पूजा केली तर, सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. या मान्यतेप्रमाणेच मांजरी मचला या गावातील पंजाबराव अनंतराव पाटील ढेपे यांनी नवस म्हणून 411 किलो वजनाची ही घंटी मंदिराला दान दिली होती. पंजाबराव पाटील ढेपे यांना पाच पत्नी होत्या. मात्र त्यांना मूलबाळ होत नसल्यामुळे त्यांनी या मंदिरात पूजा आराधना केली. त्यावेळी या मंदिरात असणाऱ्या महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर त्यांच्या पाचही पत्नींना एकूण 13 मुले झाली. यामुळे त्यांनी ही विशाल काय घंटी या मंदिराला दान दिली अशी माहिती देखील जानराव भारस्कर यांनी दिली.
घंटीसाठी बांधले मंदिर : ही विशालकाय घंटी या मंदिराला दान दिल्यावर आधी मंदिराच्या समोर उंच असा मिनार बांधून त्याच्यावर ही घंटी बसवण्यात आली. पुढे या मिनाराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. घंटी असलेल्या ठिकाणाला मंदिराचे स्वरूप आले. आता घंटी असणाऱ्या ठिकाणाला घंट्याचे मंदिर असे म्हटले जाते. ही विशाल काय घंटी ज्या ठिकाणी आहे, त्याच्या खाली महादेवाची भली मोठी पिंड स्थापन करण्यात आली आहे. मंदिरातील ही घंटी वाजवली तर ह्या घंटीचा आवाज लगतच्या सहा किलोमीटरच्या परिसरात घुमतो. प्राचीन शिवलिंगाच्या दर्शना सोबतच भाविक या महाकाय घंटीचे देखील मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतात.
हरिद्वारच्या आखाडा समितीच्या ताब्यात होते मंदिर : 5 हजार वर्षांपेक्षाही अधिक काळापूर्वी या ठिकाणी हे स्वयंभू शिवलिंग असून फार पूर्वीपासून उत्तर भारतातील साधू महात्मे या परिसरात ध्यान साध्य करिता येत असत. यामुळे हळूहळू उत्तर भारतातील साधू संतांचे वर्चस्व या मंदिरावर स्थापन झाले. अनेक काळापर्यंत वाराणसीच्या आखाडा समितीच्या ताब्यात हे मंदिर होते. या मंदिरात त्यांच्या परवानगीशिवाय स्थानिकांना प्रवेश देखील दिला जात नव्हता.
मंदिराचे सार्वत्रिकरण : 1950 मध्ये या भागातील रहिवासी बद्रीनाथ पनपालिया यांनी वाराणसीच्या या आखाडा समिती विरोधात कायदेशीर लढा दिला. 1960 मध्ये या मंदिराचा ताबा वाराणसीच्या आखाडा समितीने सोडला. माझे आजोबा बद्रीनाथ पनपालिया यांच्या अध्यक्षतेत या मंदिराच्या देखरेखीसाठी समिती स्थापन झाल्याची माहिती या मंदिर संस्थांचे विद्यमान अध्यक्ष कैलाश पंतपालिया यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. या मंदिराचे सार्वत्रिकरण झाल्यावर धामन्रीसह लगतच्या गावातील भाविकांना या मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेता येऊ लागले. मध्यंतरी पुन्हा एकदा वाराणसीच्या आखाडा समितीने या मंदिरावर आपला दावा केला होता. मात्र, त्यांचा हा दावा देखील कायदेशीर लढाईने हाणून पाडण्यात आला असून 2017 पासून मी स्वतः अध्यक्ष म्हणून या मंदिर संस्थांची जबाबदारी पाहतो आहे असे कैलाश पणपालिया यांनी सांगितले.
श्रावण महिना आणि शिवरात्रीला भाविकांची गर्दी : अतिशय प्राचीन अशा या नागेश्वर शिवलिंगाच्या दर्शनाकरिता रोज काही भाविक येतात. मात्र महाशिवरात्रीला या जागृत मंदिरात मोठी यात्रा भरते. लाखभर लोक महाशिवरात्री दरम्यान या शिवलिंगाचे दर्शन घेतात. श्रावण महिन्यात देखील भाविकांची गर्दी मंदिरात उसळते, असे कैलाश पणपालिया म्हणाले. येणाऱ्या काळात नैसर्गिक दृष्ट्या अतिशय सुंदर ठिकाणी वसलेल्या या मंदिराच्या परिसरात छानसे फुलांचे उद्यान निर्माण केले जाणार आहे. मंदिरापासून वर्धा नदीपर्यंत रस्ता तयार करण्यात आला असून या रस्त्याच्या दुतर्फा विविध वृक्ष लावण्यात येत असल्याची माहिती देखील कैलाश पण पाली यांनी दिली.
हेही वाचा - Ashadhi Wari 2023 : 'पाऊले चालती पंढरीची वाट', फोटोतून पहा आषाढी वारी