अमरावती - मेळघाटात मोठ्या प्रमाणावर कोरोनाने शिरकाव केला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने मेळघाट कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. मेळघाटात आदिवासी बांधवांची संख्या जास्त आहे. याठिकाणी आजही नागरिक अंधश्रद्धा पाळतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे.
प्रशासनाचे अनेक वेळा जनजागृती करूनही नागरिक रूग्णालयात न जाता भोंदूबाबा आणि मांत्रिकाकडे जातात. त्यामुळे मेळघाटात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यात सध्या कोरोनाचे 185 कोरोना अॅक्टिव्ह रूग्ण आहेत तर, चिखलदरा तालुक्यात 81 रूग्ण आहेत. काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन कर्मचारी देखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते. मेळघाटातील नागरिक कोरोनाचे नियम लोक पाळत नाहीत, अशी माहिती आरोग्य अधिकारी दिलीप रनमले यांनी दिली.
शनिवारी जिल्ह्यात आढळले 799 कोरोनाबाधित -
नवीन आकडेवारीनुसार जिल्ह्यात शनिवारी 799 नवे कोरोनाबाधित आढळले. तर, 11 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 54 हजार 976 वर गेली असून 50 हजार 353 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या 4 हजार 803 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत एकूण 820 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.