अमरावती - मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर, राज्य सरकारच्या वतीने दहा हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यातील साडेपाच हजार कोटीच कृषी क्षेत्रासाठी मिळणार आहेत. त्यामुळे तोंडाला पाने पुसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेलं पीक हे निसर्गाने हिसकावून घेतलं. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासनाकडून मदत जाहीर झाली, मात्र ती देखील अपुरी असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सरकार मदतीमध्ये देखील दुजाभाव करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परतीच्या पावसाने राज्यातील सर्वच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. मात्र असे असताना सरकारच्या मदतीचा ओघ हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडेच आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना मदत दिली जात नसल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
आधी बोगस बियाणं, पीक काढणीच्या वेळी झालेली अतिवृष्टी, सोयाबीन वर आलेली खोडकीड आणि आता कापसावर पडलेली बोंड अळी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादनात प्रचंड घट झाली आहे, अतिवृष्टीमुळे खरीपाचे पीक हातचे गेले त्यामुळे यंदाची दिवाळी अंधारात जाणार अशा व्याथा शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत.
सरकारकडून विर्दभातील शेतकऱ्यांवर अन्याय - बोंडे
पश्चिम विदर्भात मागील दहा महिन्यांत ८००पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना अद्यापही मदत मिळाली नाही. अमरावती जिल्ह्यात बोंड अळीमुळे हजारो एकर कपाशी शेतकऱ्यांनी उपटून फेकली आहे.
आरोप-प्रत्यारोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या वाट्याला त्यातील 5 हजार 500 कोटीच आले. विदर्भात अतिवृष्टी झाली. मात्र तरीदेखील पावसाची सरासरी कमी दाखवून शेतकऱ्यांना वंचित ठेवल्याचा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडेयांनी केला आहे. तर, दुसरीकडे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बोंडे यांचे आरोप खोडून काढत विरोधकांनीच विदर्भावर अन्याय केल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा - दिवाळीच्या खरेदीसाठी नागपूरकरांची बाजारपेठेत झुंबड; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
हेही वाचा - बीएड प्रथम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या; विरोधानंतर विद्यापीठाकडून निर्णय