कोल्हापूर - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतलेल्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्यास त्यांचे फोटो काढा. आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. त्यांच्या या विधानावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. चौफेर टीका झाल्यानंतर खासदार महाडिक यांनी महिलांची माफी मागितली आहे.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत खासदार धनंजय महाडिक यांची जीभ घसरली. "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा. आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो," असं त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. खासदार महाडिक म्हणाले, " पैसे आमच्याकडून घेता. गुणगान त्यांचं गाता हे चालणार नाही." खासदार धनंजय महाडिक हे लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या विधानानं वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
लाडक्या बहिणींना दम?महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' महिलांसाठी किती फायदेशीर ठरली, याची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीतील सत्ताधारी लाडक्या बहीण योजनेचे जोरदार ब्रँडिंग करत आहेत. तर विरोधकांकडून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अशा स्थितीत राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी भर प्रचार सभेत या योजनेवरून लाडक्या बहिणींना दम भरला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत खासदार महाडिक यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीची कोंडी होणार आहे.
टीकेनंतर मागितली माफी-खासदार महाडिक यांनी एक्स सोशल मीडियावर पोस्ट करत महिलांची माफी मागितली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची बिनशर्त माफी मागतो. वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी नव्हते. राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारमुळेच यशस्वी झाल्याचे ठामपणे सांगितले. 'व्होट जिहाद' करणाऱ्या महिलांबाबत स्वाभाविक प्रतिक्रिया होती," असे महाडिक यांनी म्हटलं आहे. "राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान केला आहे. भगीरथी महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी चांगले काम करत आलो आहे," असा त्यांनी दावादेखील केला.
बिनधास्त फोटो घ्यालोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी धनंजय महाडिक यांच्या विधानावरून महायुतीवर निशाणा साधला. खासदार शिंदे म्हणाल्या," महिलांचे फोटो काढा, असे म्हणाले आहेत. कोणत्या पद्धतीची भाषा आहे? महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी भाषा आहे का? बिनधास्त फोटो घ्या. यांची कशी हिंमत होते? यांना वरून आशीर्वाद आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांचे फोटो काढायचे. अशी विकृत मानसिकता वरून खालीपर्यंत आहे."
निवडणूक आयोगानं दखल घ्यावी-"निवडणूक आयोगानं महाडिक यांच्या वक्तव्याची गांभीर्यानं दखल घ्यावी," असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी एक्स सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त करताना म्हटले, " भाजपाचे नेते खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. महिलांना दमदाटी करण्याच्या प्रकारातून भाजपाचा लोकशाही व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे, हे सिद्ध होते. भाजपा नेत्याचे हे विधान लोकशाही आणि संविधानाच्या विरोधातील आहे. कोणत्या पक्षाच्या रॅलीत नागरीकांनी सहभागी व्हायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. यासाठी कुणीही कुणावर दबाव टाकू शकत नाही."
याआधीही खासदार महाडिक यांची घसरली होती जीभ- 2022 मध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तेव्हादेखील महाडिक यांनी जाधव यांना उद्देशून टीका केली. तेव्हा त्यांनी म्हटले होते, "तुमच्या कुटुंबातील तुमचा पती गेला. तो आधी प्लंबिंग काम करत असेल तर तुम्हाला प्लंबिंग काम जमणार आहे का? जर तुमचा पती इलेक्ट्रिशियन असेल तर तुम्हाला ते काम जमणार आहे का? ज्याचे काम त्यानेच करायचे असते. त्यांचे पती आमदार होते. म्हणून लगेच त्यांच्या पत्नीला पुढे आणले," असेही धनंजय महाडिक म्हणाले होते.
हेही वाचा-