मुंबई : दक्षिण मुंबईतील भायखळा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. भायखळा या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधव या विद्यमान आमदार आहेत. त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीनं तिकीट दिलं होतं. मात्र, शिवेसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा यामिनी जाधव भायखळातून विधानसभा लढवत आहेत.
यंदा यामिनी जाधव शिवसेनेचा गड शिंदेंसाठी राखणार का? की महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उबाठा) नेते मनोज जामसुतकर माजी मारणार? हा प्रश्न आहे. "मी आतापर्यंत जी काही कामं केली ती मतदारांच्या समोर आहेत. त्यामुळं जनता नक्कीच मला कौल देईल", असा विश्वास यामिनी जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.
काय म्हणाल्या यामिनी जाधव? : शिवसेनेत झालेल्या बंडाविषयी विचारण्यात आलं असताना यामिनी जाधव म्हणाल्या की, "महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर तपास यंत्रणाच्या धाडी पडल्या होत्या. अनेकांच्या मागं ईडीची चौकशी लागली. त्यावेळी मी आणि यशवंत जाधवांनी स्वाभिमानानं लढा दिला. मी घाबरुन कुठंही पळून गेले नाही. जर जायचंच असतं तर तेव्हाच गेले असते. मात्र, अशा परिस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमची साधी विचारपूसही केली नाही. त्याचं आम्हाला वाईट वाटलं. त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर आम्हीही स्वाभिमानानं त्यांच्यासोबत गेलो. आजही शिवसेनेत स्वाभिमानानंच काम करतोय."
...त्यामुळं जामसुतकर यांनी आदित्य ठाकरेंशी जवळीक केली : शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार मनोज जामसुतकर यांनी यामिनी जाधव यांनी मतदारसंघात समाधानकारक कामं केली नसल्याचा दावा केलाय. यासंदर्भात विचारण्यात आलं असताना यामिनी जाधव म्हणाल्या, "मनोज जामसुतकर यांनी अनेक पक्ष फिरुन शेवटी शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केलाय. त्यांचं महत्त्वाचा अडसर म्हणजे यशवंत जाधव हे होते. मात्र, आम्ही शिंदेंसह गेल्यामुळं त्यांचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळं त्यांनी आदित्य ठाकरेंशी जवळीक करुन संधी साधली. मतदारसंघात जर फिरुन पाहिलं तर माझी कामं तुम्हाला दिसतील. तसंच माझी काम जनतेसमोर आहेत. पण जामसुतकर यांनी काय केलंय ते सांगावं. ते नवखे उमेदवार आहेत. त्यामुळं मी काय केलं काय नाही, हे त्यांनी सांगण्याची गरज नाही," असे यामिनी जाधव म्हणाल्या.
आम्ही ईडीला घाबरलो नाही : छगन भुजबळ यांनी आपल्या पुस्तकात 'आम्ही ईडीला घाबरून सत्तेत सहभागी झालो', असं म्हटलंय. असाच आरोप शिवसेनेवर केला जातोय. याविषयी यामिनी जाधव यांना विचारलं असता, "आम्ही ईडीला किंवा तपास यंत्रणेला घाबरलो नाही. छगन भुजबळ यांनी आपल्या पुस्तकात असं का म्हटलंय? ते घाबरुन का गेले? याचं उत्तर तेच देऊ शकतील", असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा -