अमरावती - नांदगाव खंडेश्वर तालुक्यात बेंबळा नदीच्या पुराचे पाणी नदी काठावरील शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाची रिपरिप सुरू आहे. सततच्या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा सूर तालुक्यातील शेतकऱ्यांमधून उमटत आहे.
हेही वाचा - खासदार डॉ.अनिल बोंडे यांची राज्यसभेच्या प्रतोदपदी निवड
पुराच्या पाण्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करावे, असे आदेश आमदार प्रताप अडसड यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. झालेल्या नुकसानीचे अहवाल करण्याचे आदेश सर्वांना देण्यात आले आहेत व पूर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष आहे. कुठेही काही अडचण असल्यास प्रशासनाकडून मदत करण्यात येणार असल्याची माहिती नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी दिली.
तालुक्यातील मंगरूळ, चव्हाळा, शेलू, चिखली, शिवनी, बेलोरा, येवती, धामक, जावरा, मोडवन, वाघोडा, धानोरा, गुरव, पहूर या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याखाली आली. तर यांच्यासह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. चांदसुरा, जसापूर येथील दोनशे शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाला आहे. तर पळसमंडळ येथील नवीनच बांधकाम झालेल्या पुलाच्या बाजूने काढून दिलेल्या नाल्याला आलेल्या पुरामुळे बंब्यासह रस्ता वाहून गेला. बाघोडा येथे झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांना नुकसान झाले तर गावातील घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे सुद्धा मोठे नुकसान झाले.
भगोरा कोठोडा माऊली चोर येथील पाणंद रस्ता खरडून गेल्याने शेतकऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. शिवरा, पिंपळगाव, निपाणी, दहेगाव या गावांत सुद्धा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व तालुक्यातील जवळपास 39 घरांची पडझड झाली असून, एक घर पूर्णतः पडले. शासनाकडून यांना मदत व्हावी, अशी मागणी सर्वत्र होऊ लागली आहे.
पळसमंडळ गावाचा पर्यायी रस्ता गेला वाहून - जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून नानसावंगी ते पळसमंडळ या रस्त्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. पुलाचे बांधकाम सुरू असल्याने या मार्गावर पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु, नाल्याला आलेल्या पुरामुळे तो रस्ता वाहून गेला आहे. तातडीने पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पळसमंडळ ग्रामपंचायतचे सदस्य निखील मोरे यांनी केली.