अमरावती - शासनाने अधिग्रहित केलेल्या जमिनीवर तलाव झाला नाही; ती जमीन परत मिळावी, यासाठी लढा देणारे शेतकरी अनिल चौधरी यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मात्र आज त्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अनिल महादेवराव चौधरी हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव येथील रहिवासी होते. 20 वर्षापूर्वी अनिल चौधरी यांची 10 एकर शेत जमीन शासनाने तालावसाठी अधिग्रहित केली होते. मात्र 10 एकरापैकी 7 एकर जमिनीवरच शासनाने तलावाची निर्मिती केली होती. त्यामुळे उर्वरित 3 एकर जमीम परत मिळावी यासाठी अनिल चौधरी यांची न्यायालयीन लढाई सुरू होती.
समृद्धीसाठी मुरूम नेण्यास विरोध-
दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना 15 मे'ला अमरावती जिल्हा परिषदेने अनिल चौधरी यांच्या उर्वरित 3 एकर शेतातून समृद्धी मार्गासाठी मुरूम खोदून नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर 'माझ्या शेतीच प्रकरण न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे माझ्या शेतातून मुरूम नेऊ नये', असे निवेदन अनिल चौधरी यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांना सादर केले होते.
या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देऊनही अनिल चोधरी यांच्या शेतातून मुरूम काढणे सुरू होते. त्यामुळे चौधरी यांनी गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आधी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांच्या जवळची रॉकेलची कॅन ओढून घेतली. त्यावर अनिल यांनी सोबत आणलेले विषारी औषध पिले होते.
या घटनेनंतर अनिल चौधरी यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान अनिल चौधरी यांची प्राणज्योत मालवली आहे.