अमरावती : तुम्ही साधारणत: कुलुप २ ते ७ इंचापर्यंतचे पाहिले असेल. पण चांदूर रेल्वे शहरात तब्बल १० फुटांचे प्रतिकात्मक कुलुप बनवण्यात आले आहे. या कुलपाची भव्य मिरवणूक २ ऑक्टोबरला काढण्यात येणार असल्याची माहिती रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी दिली. हे कुलुप रेल रोको कृती समितीतर्फे स्टेशन मास्तरांना भेट देऊन स्टॉप मिळत नसल्यामुळे रोष व्यक्त करण्यात येणार आहे.
सर्व गाड्यांचा स्टॉप नसल्याने आंदोलन
चांदूर रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र एक्स्प्रेस, हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, कुर्ला एक्स्प्रेस या गाड्यांचा स्टॉप देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता चांदूरवासी आक्रमक होताना दिसत आहेत. सर्व रेल्वे गाड्यांना स्थानिक स्टेशनवर स्टॉप देण्यात यावा, अन्यथा स्टेशन बंद करण्यात यावे. या मागणीसाठी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीदिनी चांदूर रेल्वे स्टेशन मास्तर यांना कुलूप भेट देण्यात येणार आहे.
कुलपाची चावीही तीन फुटांची
साधे कुलुप भेट दिले जाणार आहे. शिवाय सोबत तब्बल १० फुटांचे प्रतिकात्मक कुलुप सुध्दा भेट देण्यात येणार आहे. ८ दिवसांपासून चांदूर रेल्वे शहरात हे कुलुप तयार होत आहे. या प्रतिकात्मक कुलपासह २ ऑक्टोबरला भव्य मिरवणूक निघणार आहे. या कुलुपची चाबी सुध्दा चक्क तीन फुटांची बनवण्यात आली आहे. त्यामुळे या कुलपाची चांदूर रेल्वे शहरात चांगलीच चर्चा रंगत आहे. दरम्यान, या आंदोलनात मोठ्या संख्येने शहरवासी सहभागी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - परमबीर सिंग यांचे देशाबाहेर पलायन? लंडनला गेल्याची चर्चा?