अमरावती : Telangana Tourist Car Accident : अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण असलेलं चिखलदरा येथे भीषण अपघात झालाय. मेळघाटातील परतवाडा- चिखलदरा मार्गावर असणाऱ्या मडकी गावाजवळ तेलंगाणातून आलेल्या पर्यटकांच्या कारचा अपघात झालाय. या अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण बेपत्ता असून, दोघे गंभीर जखमी आहेत. तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद येथील आठ पर्यटक (Telangana Tourist) विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदरा या ठिकाणी पर्यटनासाठी (Chikhaldara Tourist Place) आले होते. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं चालकाचं वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.
तेलंगाणातून पर्यटनासाठी आले होते बँक कर्मचारी : हे सर्व पर्यटक तेलंगाणा राज्यातील सहकारी बँकेचे व्यवस्थापक असल्याची माहिती समोर येत आहे. एपी 28 डी डब्ल्यू 2119 क्रमांकाच्या कारनं हे सर्व मेळघाटात फिरायला आले होते. रविवारी सकाळी परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मडकी गावालगत मुसळधार पावसामुळं कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांची गाडी खोल दरीत (Tourist Car Accident Amravati) कोसळली.
दोघांचा शोध सुरू : मडकी गावालगत झालेल्या या भीषण अपघातात तेलंगाणातील पर्यटकांची कार खोल दरीत कोसळली. या अपघातात चार जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. एकूण आठ जणांपैकी दोन जण हे आणखी खोल दरीमध्ये कोसळले असून, बचाव पथकाच्या वतीनं त्यांचा शोध घेणं सुरू आहे. या अपघातातील गंभीर जखमींना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. परंतु, त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्यामुळं त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावपथक कार्य सुरू असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
मृतांची नावं पुढीलप्रमाणं : अपघाताची माहिती मिळताच चिखलदरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदत व बचावकार्य सुरू केलं. चालक शेख सलमान शेख चांद (वय 28वर्ष) , शिवा कृष्णा अदांकी (वय 30 वर्ष), वैभव लक्ष्मना गुल्ली (वय 29 वर्ष), वानापारथी कोटेश्वर राव (वय 27 वर्ष) यांचा या अपघातात मृत्यू झालाय. तसेच उर्वरित चार युवक जी शामलिंगा रेड्डी, के सुमन काटिका, के योगेश यादव, हरीश मुथिनेनी या जखमींना त्वरित उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. हे सर्व तरुण हे तेलंगाणा ग्रामीण बँकेचे कर्मचारी असून, ते द्वारकानगर, आदिलाबाद येथील रहिवासी आहेत. जखमींपैकी के सुमन कटिका व के योगेश यादव यांची प्रकृती चिंताजनक असून, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
हेही वाचा -