अमरावती - संपूर्ण जगात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे देशाl संचारबंदी लागू आहे. दोन वेळच्या जगण्याची भ्रांत असलेल्या एका निराधार वृद्ध महिलेला तात्काळ मदत मिळवून देत माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा परिचय अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील तहसीलदार यांनी दिला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी संपूर्ण देशात सध्या संचारबंदी करण्यात आलेली आहे. तर जिल्ह्याच्या सिमादेखील बंद करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम निराधार लोकांवर होताना आता दिसू लागला आहे. गरीबांची दोन वेळची खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे पशुवैद्यकीय दवाखान्याशेजारी अतिशय दुर्धर अवस्थेत राहत असलेल्या लालिबाई माने या निराधार महिलेला अन्नदान करण्याचे कार्य भोजन सेवा समितीतर्फे सुरू आहे.
लालीबाईची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून घराला भगदाड पडलेली आहेत. घरी वीज पुरवठा तर सोडाच साधी मेणबत्ती लावण्याची सुद्धा सोय नाही. ही बाब तहसीलदार कांबळे यांच्या लक्षात येताच त्यांनी महिलेच्या घरी प्रत्यक्ष भेट देत महावितरणचे अधिकारी कांबळे यांना अंधार दूर करण्याची विनंती केली. शासनातर्फे शक्य होईल ती सर्व मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे संचारबंदीच्या काळात प्रशासकीय यंत्रणेची तळमळ पुन्हा समोर आली आहे.
हेही वाचा - भाजीबाजार स्थलांतरित झाल्यावरही भाजी विक्रेत्यांच्या बेशिस्तीने गर्दी कायम