अमरावती : अमरावती शहरालगत असणाऱ्या चांगापूर येथील स्वयंभू हनुमान मंदिरात वर्षाच्या 365 ही दिवस रोज पहाटे चार वाजता अभिषेक केला जातो. अभिषेक केल्यावर हनुमानाची आरती होते आणि सकाळी सहा वाजता हनुमानाला नैवेद्य दिला जातो. जागृत देवस्थान असणाऱ्या या मंदिरात हा नित्यक्रम गत अनेक वर्षांपासून सुरू आहे.
नवसाला पावणारा हनुमान अशी मान्यता : चांगापूर येथे फार पूर्वी गाव होते मात्र कालांतराने हे गाव उठून गेले. मात्र, या ठिकाणी कडुलिंबाच्या झाडाखाली स्वयंभू हनुमान मूर्ती मात्र कायम राहिली. लगतच्या वलगाव या गावातील श्री वल्लभ बद्रीनाथ लढ्ढा यांच्या स्वप्नात सांगापुर येथील हनुमान ताने दृष्टांत दिल्यावर त्यांनी 1935 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. नवसाला पावणारा हा हनुमान अशी मान्यता असून अमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक गावातून सांगापुर नरेशाच्या दर्शनासाठी अनेक भाविक प्रत्येक शनिवारी या ठिकाणी येतात.
असा होतो मंदिरात पूजा विधी : चांगापूर येथील हनुमान मंदिरात रोज पहाटे चार वाजता अभिषेक केला जातो. यानंतर हनुमानाची आरती आणि सकाळी सहा वाजता भाजी पोळी वरण भात असा नैवेद्य दाखविला जातो. दर शनिवारी रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत सुंदर कांड केले जाते. यावेळी अनेक भाविक कुटुंबासह उपस्थित असतात.
मंदिर परिसरात पुरातन विहिरीला प्रदक्षिणा मारण्याचे आहे महत्त्व : सांगापूर येथील श्री हनुमान मंदिर परिसरात पुरातन अशी विहीर आहे. या विहिरी खाली गुफा आहे. या विहिरी भवती तटबंदी उभारण्यात आली असून विहिरीवरच महादेवाचे मंदिर आहे. या विहिरीला 108 प्रदक्षिणा मारल्या तर आपली इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे.
मंदिर परिसरात ध्यान धारणेसाठी विशेष गुफा : 1935 मध्ये वलगाव येथील वल्लभ लड्डा यांनी छोटेखानी वाडा उभारला. या वाड्याच्या खाली विशेष अशा गुफा तयार करण्यात आले आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात देखील या गुफा थंडगार राहतात. या गुफांमध्ये अनेक भाविक ध्यान साधना करतात.
भाविकांचा राहतो महाप्रसाद : सांगापूर येथील जागृत हनुमानाचा दृष्टांत ज्या भाविकांना झाला असे अनेक भाविक या मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करतात. या भाविकांना मंदिराच्यावतीनेच स्वयंपाकाचे भांडे मोफत उपलब्ध करून दिले जातात. लग्न सोहळ्यासाठी मात्र मंदिर संस्थांच्या वतीने अतिशय अल्प दरात हा परिसर उपलब्ध करून दिला जातो. शनिवारी आणि रविवारी भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करीत असल्यामुळे लग्नाकरिता शनिवारी आणि रविवारी मंदिर परिसर कोणालाही उपलब्ध करून दिला जात नाही.
हेही वाचा - Jubilation In Aurangabad: औरंगाबादच्या नामांतरनंतर मनसे, ठाकरे गटाचा जल्लोष; शिंदे गटाने बदलल्या पाट्या