अमरावती - शहरातील लालखडी परिसरातील जामेआ नगरातील इस्लामिया बुस्ताने फातेमा लिलबनात हा मदरसा आहे. येथील मदरसाप्रमुख मुफ्ती जिया उल्ला खान याने दोनवेळा मदरशातीलच एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार सोमवारी पोलीस तक्रारीनंतर उघडकीस आला होता. या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली होती. पोलिसात तक्रार दाखल होण्याच्या काही तास अगोदरच फरार झालेला आरोपी मुफ्ती जिया उल्ला खान याने एका व्हिडिओ क्लिपद्वारे आपण आत्मसमर्पण करणार असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा - मुस्लीम समाजातील मुलीची लग्नपत्रिका व्हायरल, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
मंगळवारी रात्री मदरसाप्रमुख आरोपी मुफ्ती जिया उल्ला खान याने नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. मंगळवारी रात्रीच त्याला अमरावतीच्या नागपूर गेट पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज त्याला जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील १६ वर्षीय मुलगी अमरावतीच्या लालखडी परिसरातील निवासी मदरसा येथे १ ऑगस्ट २०१९ ला शिक्षण घेण्यासाठी दाखल झाली होती. २४ सप्टेंबर २०१९ ला पीडित अल्पवयीन मुलीला मदरसाप्रमुख मुफ्ती जिया उल्ला खान याने त्या मुलीला एका खोलीत नेले. दरम्यान, मुलीने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर धास्तावलेली मुलगी आपल्या गावी गेली. त्यानंतर घडलेला हा धक्कादायक प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने हा प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी सोमवारी रात्री पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. परंतु तक्रार दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला आरोपी मुप्ती जिया उल्ला खान याने व त्याची सहकारी आरोपी महिला हिनेसुद्धा पळ काढला होता.
हेही वाचा - अमरावतीच्या तिवस्यात वीज वितरण कार्यालयावर नागरिकांचे शोले स्टाईल आंदोलन
मंगळवारी नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीने आत्मसमर्पण केले तर, महिला अद्यापही फरार आहे. आज जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी जिया उल्ला खानला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चौकशी दरम्यान पोलीस आणखी सखोल तपास करणार आहेत.