अमरावती - पूल बांधणे किंवा रस्ते बांधणे म्हणजेच विकास नाही तर विकास हा खऱ्या अर्थाने सर्वांगीण असायला हवा. त्यामुळे, माझा भर हा सर्वांगीण विकासाकडे राहणार असल्याचे अमरावतीच्या नवनियुक्त आमदार सुलभा खोडके यांनी म्हटले आहे.
17 ऑगस्टपासून मी जनतेच्या भेटीला निघाली आहे. अमरावतीच्या प्रत्येक भागात माझ्या कार्यकर्त्यांनी तनाने आणि मनाने मेहनत घेतली. आज मी जरी आमदार झाले असले तरी हा विजय माझ्या सहकार्यांचा असून माझे कार्यकर्तेच आता आमदार झाले असल्याचे त्या म्हणाल्या.
अमरावती विधानसभा मतदार संघात युतीचे डॉ. सुनील देशमुख यांचा सुलभा खोडके यांनी 18 हजार 268 मतांनी पराभव केला. सुलभा खोडके यांना 82 हजार 581 मतं मिळाली. तर डॉ. सुनील देशमुख यांना 64 हजार 313 मतांवर समाधान मानावे लागले. अमरावती मतदारसंघाचा निकाल दुपारी साडेतीन वाजताच स्पष्ट झाला. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यावर 11 वाजेपर्यंत डॉ. सुनील देशमुख आघाडीवर होते. 12 वाजता मात्र सुलभा खोडके यांनी 4572 मतांची आघाडी घेतली आणि त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच सुलभा खोडके या विजयी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
रात्री आठ वाजता विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी मतमोजणी केंद्रावर आल्या असता सुलभा खोडके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, 2009 च्या निवडणुकीत बडनेरा मतदारसंघात माझा पराभव झाला असला तरी माझा जनसंपर्क सतत कायम होता .2004च्या माझ्या पहिल्या निवडणुकीत अमरावती शहरातील तपोवन ते नवसारीपर्यंतचा परिसर बडनेरा मतदार संघात होता. या भागाशी माझा संपर्क कायम होता. यावेळी अमरावती मतदारसंघातून मी पहिल्यांदा निवडणूक लढवली. खरतर 17 ऑगस्टपासून मी प्रचारासाठी बाहेर पडले मतदार संघातील प्रत्येकाशी मी संपर्क साधला. शहरातील प्रत्येक परिसरात असणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे फळ आज माझ्या विजयाने मिळाले आहे. अमरावती शहराला विकासाची गरज आहे आणि विकासाचे काम खऱ्या अर्थाने मी करणार आहे.