अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी आज बुधवारी अंजनगाव सुर्जी शहरातील मुख्य बाजारपेठेची अचानक पाहणी केली. यावेळी बाजारपेठेत सर्वांची एकच खळबळ उडाली.
गेल्या अनेक दिवसांपासून अंजनगाव सुर्जी शहरातील मुख्य बाजारपेठेत ‘सोशल डिस्टंसिंग’चा फज्जा उडत असल्याचे दिसून येत होते. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर (दर्यापूर) यांनी शहरातील पान अटाई, मुख्य बाजारपेठ, चावडी चौक, आलम चौक, पाचपावली या भागात जवळपास तीन तास पाहणी दौरा केला. यावेळी शहरात सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे समोर आले. त्यामुळे आंबेकर यांनी दुकानदारांंविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.
आंबेकर यांनी पान अटाई येथील एका दुकानदाराचे दुकान सील करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यास सांगितले. आंबेकर यांच्या कारवाईची धडक मोहीम पाहून काहींनी आपली दुकाने बंद केली. यावेळी अनेक दुकानांमध्ये सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे समोर आले.
पाच पावलीजवळ परवानगी नसतानासुद्धा भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणात हात गाडीवर भाजी विक्री करत होते. त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्याचे आदेश आंबेकर यांनी दिले. शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या या धडक मोहीमेमुळे बाजारपेठेत एकच खळबळ उडाली होती.
मुख्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस -
अंजनगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे काम समाधानकारक नसल्याचे आज उपविभागीय अधिकारी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे. अंजनगाव शहरातील पाहणी दौऱ्यातील संपूर्ण माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी सांगितले.
जवळपास तीन तास त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेची पूर्णपणे पाहणी केली. त्यांच्यासमवेत तहसीलदार विश्वनाथ घुगे, नायब तहसीलदार सोळंके, मंडल अधिकारी राजेश मिरगे, तलाठी राजकुमार गवई, मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ तसेच नगरपालिकेचे कर्मचारी असा ताफा होता.