अमरावती- ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटनेचा मोर्चा आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ऐन सिनेटच्या बैठकीवेळीच धडकला. राज्य शासनाने माफ केलेले परीक्षा शुल्क अद्यापही विद्यार्थ्यांना मिळाले नाही. तसेच पीएचडीसाठी केलेली शुल्कवाढ रद्द व्हावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कला आणि वाणिज्य शाखेकरिता लागू करण्यात आलेली सेमिस्टर पद्धत ही विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास वाढविणारी ठरली आहे. पाठ्यक्रम पूर्ण न होताच परीक्षा घेतल्या जातात, हा प्रकार अयोग्य आहे. तसेच, पीएचडीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत शुल्कवाढ करण्यात आली आहे. इतकी मोठी रक्कम गरीब विद्यार्थी देऊ शकत नाही. त्याचबरोबर, २०१८-१९ मध्ये दुष्काळामुळे शासनाने शुल्क रद्द केले असताना विद्यार्थ्यांनी भरलेली रक्कम अद्याप त्यांना परत मिळाली नाही. कुलगुरूंनी आठ दिवसात तोडगा काढला नाही तर विद्यापीठाला कुलूप ठोकणार, असा इशारा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे कैलास चव्हाण यांनी दिला. कुलगुरूंनी बैठकीतून बाहेर येऊन आमच्याशी बोलावे, अशी मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली.
या आंदोलनात सचिन राठोड, प्रितम चौधरी, शुभम राणे यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सीनेटची बैठक सुरू असताना अधिष्ठाता डॉ.एफ.सी. रघुवंशी यांनी बैठक संपल्यानंतर तुमची कुलगुरूंशी भेट घालून देण्यात येईल, असा शब्द दिला. त्यानंतर विद्यार्थी शांत झाले.
हेही वाचा- लाकूड बाजारात लागलेल्या आगीत ७ ते ८ दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान