अमरावती - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या चारशेहून अधिक झाली आहे. जिल्ह्याच्या पूर्वेस वर्धा जिल्ह्याची सीमा लागूनच आहे. त्यामुळे अमरावतीतून वर्धा जिल्ह्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अमरावती-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीच्या पूलालगत देउरवाडा या गावाजवळ वर्धा पोलिसांच्या वतीने वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. ज्या लोकांना पोलिसांची परवानगी आहे, त्याच लोकांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात असून प्रत्येक वाहनाची नोंदणीही करण्यात येत आहे.
सुरुवातीला राज्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असताना वर्धा जिल्हा प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे दोन महिने जिल्हा कोरोनामुक्त होता. दरम्यान, गेल्या एका महिन्यापूर्वी जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढल्याने जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा पूर्वीपासून असलेला बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला आहे. वर्ध्यात आतापर्यंत एकूण १४ कोरोनाबाधित आढळले होते. त्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशातच अमरावतीत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वर्धा जिल्हा प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे.