अमरावती - सातत्याने कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, सुविधांचा अभाव या कारणांनी सातत्याने चर्चेत असलेला मेळघाटातील आदिवासी शेतकरी आता पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळू लागला आहे. थंड हवामानाचा फायदा घेत येथील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून स्ट्रॉबेरी शेतीकडे वळले आहे. त्यामुळे यंदाही मेळघाटातील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या लागवडीला सुरुवात केली आहे.
जिल्हा नाविन्यता परिषद, नियोजन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवड हा पथदर्शी प्रकल्प राबविला गेला होता. या पथदर्शी प्रकल्पाची यशस्विता म्हणजे पन्नास शेतकऱ्यांच्या दहा गुंठे शेतीवर स्ट्रॉबेरी लागवडीनंतर त्यांना किमान दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले. यामुळेच यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने स्ट्रॉबेरी लागवड सुरू केली आणि गेल्या सहा वर्षांपासून ते स्ट्रॉबेरी लागवड करीत आहे. या लागवडीतून त्यांना दरवर्षी चांगले उत्पन्न मिळत आहे. जे उत्पन्न त्यांना पारंपरिक शेतीमधून मिळत नव्हते, त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न कमी खर्चात, कमी वेळेत, कमी श्रमात त्यांना मिळत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी हे स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळले आहेत.
मेळघाट क्षेत्रातील चिखलदरा या तालुक्यात मोथा, आलाडोह, खटकाली, शहापूर अशा विविध गावात शेतकरी स्ट्रॉबेरी लागवड करीत आहेत. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे या लागवडीस थोडा उशीर झाला परंतु आता पावसाने उसंत दिल्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड सुरू केली आहे. महाबळेश्वर क्षेत्रातून स्ट्रॉबेरीचे रोप मागवून गादी वाफा पद्धतीने मल्चिंग पेपर अंथरून त्यावर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. सिंचनाकरिता ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येत असून, यामुळे पाण्याचीसुद्धा बचत होत आहे.
मेळघाटातील प्रामुख्याने आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीच्या पीकातून चांगले उत्पन्न मिळत आहे. चिखलदरा हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे मार्केटिंगची समस्या नाही. स्ट्रॉबेरीशी निगडित सोयीसुविधा उपलब्ध झाल्यास येथील अर्थकारण बदलण्यास वेळ लागणार नाही हे नक्की.
हेही वाचा - अंबादेवी देवस्थान : अमरावतीत भाविकांना मुख्य प्रवेशद्वारावरूनच दर्शन