अमरावती - देशात वाढते इंधनाचे दर, सिलेंडरचे गगनाला भिडलेले भाव आणि वाढती महागाई या विरोधात काँग्रेसकडून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. शनिवारी मुंबई येथील काँग्रेस आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात ते बैलगाडीवर उभे राहिले होते. मात्र, आंदोलनादरम्यान बैलगाडीवर भार वाढल्याने ती तुटली. त्यामुळे भाई जगताप यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी खाली पडले.
केंद्र सरकार विरोधात आंदोलन सुरू असताना घडलेल्या या प्रकारावर भाजपने कडाडून टीका केली आहे. भाजपचे कृषी मंत्री अनिल बोंडे यांनीही शेतातील हिरा नावाच्या एका बैलाला काँग्रेसपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेसचे नेते एवढे निर्दयी आहेत की मुक्या जनावरांच्या पाठीवर किती लोकांनी बसावं याचेही भान त्यांना नाही. स्वार्थासाठी त्यांनी मुक्या प्राण्यांना त्रास दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच मालकाला नुकसान भरपाई व बैलांना झालेल्या दुखापतीचा खर्चही द्यावा, अशी मागणी भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली आहे.
हे म्हणाले होते फडणवीस
मी तो व्हिडिओ पाहिला. 'देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो', अशा प्रकारच्या घोषणा जगताप आणि बाकी कार्यकर्ते देत होते. बहुतेक राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडल नाही. त्यामुळेच ही बैलगाडी तुटून सगळेजण खाली कोसळले असावे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. माझ्याकडून काँग्रेसच्या या आंदोलनाला शुभेच्छाच आहेत, असेही फडणवीस म्हणाले.