अमरावती - यंदा पेरणीनंतर बोगस बियाणे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. यातून सावरत नाही तर, शेतकऱ्यांपुढे आता अतिवृष्टीचे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिकाच्या शेंगा फुटल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाची बोंडही आता जमिनीवर पडायला लागली आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
हेही वाचा - धक्कादायक! बँक अधिकाऱ्यांच्या मुजोरीमुळे शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील वर्षीही सोयाबीन काढणीच्या वेळेतच मुसळधार पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या वर्षीसुद्धा आता सोयाबीन काढणीच्या वेळेस पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात जवळपास 30 हजार हेक्टरवर सोयाबीन पीक घेतले जाते.
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरुड मोर्शी तालुक्यात ही पावसाने झोडपून काढले आहे. तर, संत्र्याला गळती लागल्याने संत्रा उत्पादक शेतकरीही चिंतेत सापडले आहेत. ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजपाच्यावतीने राज्य सरकारला करण्यात आली आहे.
हेही वाचा - जनावरांसह नागरिकांची बळी घेणाऱ्या वाघिणीला 'अशा' प्रकारे केले जेरबंद