अमरावती : भारतात दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणण्यात आले. त्यांना मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात ठेवण्यात आले. या चित्त्यांना भारतात आणण्यापूर्वी त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने या जंगलात तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढणे अत्यंत महत्त्वाचे होते. यामुळेच या जंगलात कुरणांचा विकास करण्यावर भर देण्यात आला. यासाठी प्रा. डॉ. गजानन मुरतकर यांच्यावर शासनाने महत्त्वाची भूमिका सोपविली होती. कुनो नॅशनल पार्क ग्वाल्हेरजवळ असून या जंगलाचे क्षेत्रफळ 926 स्क्वेअर किलोमीटर इतके होते. या भागात सर्वांत आधी सिंहांसाठी कुरण विकासाचे काम हाती घेण्यात आले; मात्र सर्वोच्च न्यायालयाने या भागात सिंहांवर बंदी घालण्याचा निर्णय दिल्यावर या भागात अभयारण्य विकासाचे काम हाती घेण्यात आले.
काट्यांची झाडे काढून बनविली गवताची नर्सरी : या जंगलातील चार गावांचे पुनर्वसन करण्यात आल्यावर या ओसाड गावातील शेतीचे रूपांतर आम्ही कुरणांमध्ये केले अशी माहिती प्राध्यापक डॉ. गजानन मुरतकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. कुनो जंगलाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर या भागातून वाहणाऱ्या कुनो नदीच्या परिसरालगतच्या शेतांमध्ये बोरांसह विविध काट्यांची झाडे मोठ्या प्रमाणात होती. या भागातील काटेरी झाडे काढण्यासाठी आम्हाला अडीच वर्षे लागली. या भागातील मातीचे निरीक्षण केल्यावर सर्वांत आधी साडेसहा हेक्टर जमिनीवर गवताची नर्सरी लावली. या भागात 26 प्रकारच्या गवतांच्या प्रजाती आढळतात, असे प्रा. डॉ. गजानन मुरतकर म्हणाले.
तृणभक्षक प्राण्यांसाठी केला कुरणांचा विस्तार : या जंगलात तृणभक्षक प्राण्यांसाठी आवश्यक असणाऱ्या गवतांच्या जाती कोणत्या हे ओळखून मऊ, मुलायम गवत खाणाऱ्या तृणभक्षक प्राण्यांच्या प्रजाती तसेच कणखर गवत खाणारे तृणभक्षक या सगळ्यांचा अभ्यास करण्यात आला. याआधारे 4 एकरापासून 365 हेक्टर पर्यंत कुरणांचा विस्तार करण्यात आला. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मध्यप्रदेश वन्यजीव विभाग आणि सेवानिवृत्त वनाधिकारी सुहास कुमार यांच्या मदतीने कुरणाचा विकास करण्याचे ठरले. यासाठी सपना महाविद्यालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला आणि यानंतर कुनो जंगलातील कुरण विकासाची संपूर्ण जबाबदारी डॉ. गजानन मुरतकर यांच्यावर सोपविण्यात आली. त्या जंगलात कुरण विकासासाठी आम्हाला साडेसहा वर्षे लागली. साडेसहा वर्षांपूर्वी केवळ कुरणांची 30 ठिकाणे होती. आता मात्र साडेसहाशेच्यावर कुरणे आहेत. त्या भागात आता काळवीट, सांबर यांची संख्या वाढली आहे. यामुळेच या भागात चित्ते आणणे शक्य झाले असल्याचे प्रा. डॉ. गजानन मुरतकर यांनी सांगितले.
गावांच्या पुनर्वसनामुळे कुरणवाडीवर प्रयोग: 'इकॉलॉजिकल अँड इन्व्हरमेंटल स्टडी इन ग्रासेस ऑफ मेळघाट' हा डॉ. मुरतकर यांच्या पी.एचडीचा विषय होता. चिखलदरा येथे सपना महाविद्यालयात ते नोकरीवर लागले तेव्हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या नागरताज, बारूखेडा, नागोना, गुलरघाट, केलपाणी, धारगड, सोमठाणा आधी अशा बारा गावांचे पुनर्वसन झाले होते. वन अधिकाऱ्यांनी या भागात कुरणांचा विकास होतो का? यासाठी त्यांना मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांच्या टीमने कुरणांचा अभ्यास करून कुरण तयार केली. या कुरणा संदर्भात राष्ट्रीय पातळीवरची कार्यशाळाच चिखलदरा येथे घेतली. त्यामध्ये कुरण विकासात संदर्भात मी चांगले काम करू शकतो अशी डॉ. मुरतकर यांना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली.
बारा राज्यांमध्ये कुरणांचा विकास: डॉ. मुरतकर सांगतात की, कुरणांचा विकास मी करू शकतो अशी ओळख निर्माण झाल्यावर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने त्यांच्यावर देशातील अनेक जंगलांमध्ये कुरण विकासाची जबाबदारी सोपवली. त्या माध्यमातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 12 राज्यांमध्ये कुरण विकासाचे काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे.