अमरावती - बडनेरा मार्गावरील निभोरा परिसरात सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात सध्या काविळीच्या साथीने थैमान घातले आहे. वसतिगृहतील तब्बल ४० ते ५० विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या काळातच कावीळ आजाराने ग्रासले आहे.
निभोरा येथील वसतिगृहात सुमारे एक हजार विद्यार्थ्यी वास्तव्यास आहेत. वसतिगृहात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी जलवाहिनी जेथून त्या परिसरात गटाराचे साम्राज्य आहे. तसेच काही ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली असल्याने परिसरातील घाण पाणी त्या जलवाहिनीतील पिण्याच्या पाण्यात मिसळते, असा आरोप वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी केला आहे. ते 'ईटीव्ही भारत' शी बोलत होते.
या वसतिगृहात पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी पाणी बाहेरून विकत आणले आहे. वसतिगृहातील शौचालयही अस्वच्छ आहे. स्वच्छतेकडे सामाजिक न्याय विभागाचे लक्ष नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच कावीळ सारख्या गंभीर आजारामुळे वसतिगृहातील चाळीस ते पन्नास विद्यार्थी आजारी पडले असताना अधिक्षकांसह सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने दखल घेतली नाही. शिवाय वसतिगृहाचे अधिक्षकदेखील आठ ते पंधरा दिवसातून एकदाच येत असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
मागील १५ अनेक विद्यार्थ्यांना कावीळ झाल्याने आजारी विद्यार्थी अपल्या गावी गेले आहेत. तर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने आजारी असूनही ते अभ्यास करत आहेत.