अमरावती - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. राज्यातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. मात्र, मुख्य भाजीपाला मार्केट यार्ड कोरोनाच्या नियमांचे पालन करून सुरू ठेवण्यास सूट आहे. त्यामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठे भाजी मार्केट यार्ड सुरू आहे. परंतु, या बाजारपेठत कोरोना नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळते. येथे येणारे अनेक लोक हे मास्क लावत नाहीत व सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करत नाहीत.
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे ठोक भाजीपाला मार्केट म्हणून अमरावतीच्या मार्केटकडे पाहिले जाते. बाजारपेठेत पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भामधील हजारो शेतकरी व व्यापारी आपला शेतीमाल विकण्यासाठी येतात. बाजारपेठेत होणारी गर्दी कोरोनाचा उद्रेक होण्यास कारणीभूत ठरू शकते. बाजारसमिती प्रशासनाचा या गर्दीवर कोणताही वचक नसल्याचे दिसते.
अमरावती जिल्ह्याच्या सीमा बंद -
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून, तपासणीसाठी ठिकठिकाणी तपासणी नाके निर्माण करण्यात आले आहेत. अतिजोखमीच्या क्षेत्रातून प्रवासाला मर्यादा घालण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल तिवसा व मोर्शी येथे भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तिवसा येथील पंचायत समितीत स्थापित कंट्रोल रूमला भेट देऊन त्यांनी दैनंदिन रुग्णस्थितीचा आढावा घेतला. तसेच, ग्रामीण रुग्णालयालाही भेट दिली. उपलब्ध खाटा, खाटा वाढविण्याची गरज पडल्यास आवश्यक सुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता याबाबत त्यांनी आढावा घेतला.
हेही वाचा - ऑक्सिजनचा काळा बाजार; वाशिममध्ये 64 सिलिंडर जप्त