अमरावती - शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी आढळलेल्या सापांना पकडून सर्पमित्राने शुक्रवारी छत्री तलावामागच्या जंगलात त्यांना सुखरूप सोडून दिले. अजगर, नाग, आणि घोणस या प्रकारच्या प्रजातीतील हे सर्प होते.
गुरुवारी दुपारी अमरावती एमआयडीसी परिसरात एका कंपनीत अजगर आढळला होता. याबाबत माहिती मिळताच सर्पमित्र प्रवीण महोरे यांनी अजगराला पकडले. त्यानंतर दुपारी अमरावती-बडनेरा मार्गावरील परदेसी ढाबा येथे नाग आढळला. जोरदार आवाज करुन फुस्कारे सोडणाऱ्या नागालाही प्रविण महोरे यांनी पकडले. यानंतर गुरुवारी रात्री २ वाजता वडाळी येथील वन विभागाच्या कार्यालयात घोणस हा साप आढळून आला. या सापलाही प्रवीण महोरे यांनी शिताफिने पकडले.
सापांना पकडल्यानंतर महोरे यांनी तीनही सापांना एका पाठोपाठ छत्री तलावामागच्या जंगलात सोडले. आधी नागाला सोडण्यात आले त्यानंतर घोणस हा साप सोडण्यात आला. बंद भरणीतून मुक्त होताच नागाने फणा उगारला. बऱ्याच वेळपर्यंत नाग स्नेक स्टिकच्या दिशेने फिरत होता. अखेर प्रविण महोरे यांनी नागाला स्नेक स्टिकवर घेऊन त्याला झुडपात सोडून दिला. त्यानंतर नाग क्षणार्धात झुडपात निघून गेला. यावेळी प्रविण माहोरे यांच्यासोबत सर्पमित्र गुणवंत पाटील आणि निलेश कंचनपुरे उपस्थित होते.