अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील शिवसेनेतर्फे शहरातील बायपास रोडवर असलेल्या मोठ्या खड्ड्यांचे पूजन करून संबंधित विभागाचा शिवसेना शहरप्रमुख स्वप्निल मानकर यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध व्यक्त केला. तात्काळ खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा सुध्दा देण्यात आला.
चांदूर रेल्वे शहरात वकील लाईनच्या रस्त्याने व पुढे वळणावर बायपास रोडवर तसेच पंपहाऊस जवळ मोठमोठे खड्डे पडलेले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या या खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच या खड्ड्यांमध्ये पाणी साचुन घाणीचे साम्राज्य सुध्दा पसरत आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेतर्फे या खड्ड्यांचे पूजन करून आंदोलन करण्यात आले. यावेळी निषेध सुध्दा व्यक्त करण्यात आला.