ठाणे : कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल भागात आजमेरा या उच्चभ्रूंच्या सोसायटीत घरात धूप अगरबत्ती लावण्यावरुन दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर नंतर तुफान राड्यात झालं. यावेळी सोसायटीतील रहिवासी असलेल्या मंंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावरुन दहा जणांनी सोसायटीतील दोन मराठी कुटुंबियांना बेदम मारहाण केली. दरम्यान, या मारहाण प्रकरणी संबंधित मंत्रालयीन अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक करावी, या मागणीसह सोसायटीतील रहिवाशांनी गुरुवारी रात्री सोसायटी आवारात निदर्शनं केली.
नेमकं काय आहे प्रकरण? : आजमेरा सोसायटीतील रहिवासी धीरज देशमुख यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटलंय की, बुधवारी (18 डिसेंबर) रात्री त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लता कळवीकट्टे यांनी घरात धूप अगरबत्ती लावली होती. या अगरबत्तीच्या धुरावरुन अखिलेश शुक्ला आणि लता यांच्यात वाद सुरू होता. शुक्ला हे लता यांना "तुम्ही मराठी लोक घाणेरडे असतात. मटण मासळी खाता. तुम्हा मराठी लोकांची इमारतीत राहण्याची पात्रता नाही" असं बोलत होते. हे भांडण ऐकून मी घराबाहेर आलो. शुक्ला यांना तुमचा वाद आपसात मिटवा, पण सर्व मराठी लोकांना तुम्ही अपमानित करू नका, असं म्हटलं. मात्र, त्यावरुन शुक्ला यांनी "मी मंत्रालयात कामाला आहे. मला मराठीचं सांगू नकोस. तुमच्यासारखे 56 मराठी लोक माझ्या समोर झाडू मारतात. मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन करेन तर तुमचं मराठीपण जाईल. थोडा वेळ थांब तुला बघून घेतो", अशी धमकी दिली.
काही वेळानं देशमुख यांच्या घराची बेल वाजली म्हणून ते बाहेर आले. शुक्ला यांनी देशमुख यांच्या भावाला बाहेर बोलावलं. त्यावेळी बाहेरुन आलेल्या दहा जणांनी काठ्या, धारदार शस्त्रानं त्यांच्या भावावर हल्ला चढवला. त्यांना गंभीर जखमी केलं. भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांच्या पत्नीला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लता कळवीकट्टे यांनाही टोळक्यानं मारहाण केली. तसंच धीरज देशमुख हे देखील या मारहाणीत जखमी झाले. सोसायटीतील लोकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.
गुन्हा दाखल : या मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्ला आणि त्यांची पत्नी गिता यांच्याविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
मनसेकडून अटकेची मागणी : या सर्व प्रकरणात मनसेनं उडी घेतल्याचं बघायला मिळतंय. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर म्हणाले की, “केवळ वाद सोडवण्यासाठी धीरज देशमुख गेले होते. पण या लोकांनी त्यांना इतकं मारलं आहे की त्यांची प्रकृती गंभीर आहे. देशमुख कुटुंबासह आम्ही उभे आहोत. जर 24 तासांमध्ये या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली नाही. तर आम्ही आमच्या पद्धतीनं त्याला इकडं आणून पोलिसांच्या स्वाधीन करु”, असा इशारा त्यांनी दिलाय.
सोसायटीत निदर्शनं : शुक्ला यांनी मराठी लोकांचा अपमान केल्यानं त्यांचा निषेध करण्यासाठी सोसायटीतील लोकांनी गुरूवारी रात्री सोसायटीच्या आवारात एकत्रित येत शुक्ला यांच्या निषेधार्थ निदर्शनं केली. "शुक्ला यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील कलम लावावे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे", अशी मागणी यावेळी रहिवाशांनी केली. शुक्ला हे आपल्या वाहनावर लाल दिवा लावून फिरतात, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत.