अमरावती - १ एप्रिलपासून चांदूर रेल्वे शहरात सुरू झालेल्या शिवभोजन थाळीचे कंत्राट हे बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळवल्याचा प्रकार समोर आला. बनावट कागदपत्रांच्या आधारे सागर रमेश भोंडे (राजर्षी फॅमिली रेस्टॉरेंट, चांदूर रेल्वे) यांनी मिळवलेले कंत्राट जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रद्द केले. तहसिलदारांना पुन्हा नव्याने शिवभोजन थाळीच्या कंत्राटची प्रक्रिया राबवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
चांदूर रेल्वेत शिवभोजन थाळी केंद्राचे कंत्राट घेण्यासाठी कंत्राटदाराने बनावट कागदपत्रे सादर केल्याची बाब तक्रारकर्ते शिवसेना शहरप्रमुख स्वप्नील मानकर व सुमेद सरदार यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिली होती. या प्रकरणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ठोस कारवाई करत कंत्राटदार सागर भोंडे यांचे कंत्राट रद्द केले. तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्तांची समिती तयार करुन शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
शहरात बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी सक्रिय असल्याचे प्रशासनानेच कबुल केले असून त्याच्या चौकशीसाठी कमिटी स्थापन करून चौकशीचे आदेशही दिले आहे. असे असल्यास शहरात आजपर्यंत मिळवलेले अनेक कंत्राट हे बनावट कागदांच्या माध्यमातून तर घेतले नाही ना असाही प्रश्न निर्माण होत आहे.