मेळघाट (अमरावती) - कुसुमकोट गावात 15 जण बाहेरून आले असल्याची माहिती मिळताच धारणी पोलिसांनी कारवाई करून बाहेरून आलेल्या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांना पाहून सात जण पसार झाले असून, मेळघाटमध्ये बाहेरून येणाऱ्यांना गावात आश्रय देणाऱ्या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतलेल्या आठही जणांना धारणी येथील कस्तुरबा शाळेतील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
मेळघाटातील कुसुमकोट येथे मेळघाट बाहेरून काही लोक आल्याची माहिती धारणी येथील काहींना मंगळवारी रात्री मिळाली. बाहेरून आलेल्या लोकांना कुसुमकोट येथील मशिदीत आश्रय दिल्याचे रात्री समोर आले होते. भाजपचे तालुकाध्यक्ष आप्पा पाटील यांनी या प्रकारबाबत तक्रार दिल्यावर धारणी पोलिसांनी आज सकाळी कुसुमकोट येथे धडक दिली. यावेळी मशिदीत लपून बसलेल्या सार जणांनी पळ काढला तर आठ जण पोलिसांच्या हाती लागले आहे. यापैकी तीन जण हे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुका येथील रहिवासी असल्याचे त्यांच्याजवळ मिळालेल्या आधार कार्डद्वारे समजल्याची माहिती धारणीचे ठाणेदार तांबे यांनी 'ईटीव्ही भारत'ला माहिती देताना सांगितले.
आठही जणांना धारणी येथील कस्तुरबा शाळेतील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. हे लोक खांडवा येथून मेळघाटात आले असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे ठाणेदार तांबे म्हणाले. कुसुमकोट येथील मशिदीत या लोकांना आश्रय देणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल कसरण्यात आला असल्याचेही तांबे यांनी सांगितले.