अमरावती - वाघांची शिकार करणारी टोळी मेळघाट क्राइम सेलने गजा आड केली आहे. त्यांच्याकडून वाघ नखांसह वाघांचे दातही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या सेमाडोह वनपरिक्षेत्रात वनखंड १४९ या अभयारण्य क्षेत्रात, शिकारी आल्याची माहिती मेळघाट क्राइम सेलसह अभयारण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली. तेव्हा सेमाडोह वनपरिक्षेत्राचे अधिकारी सम्राट मेश्राम व सुहास मोरे आणि हिरालाल चौधरी यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी साफळा रचून त्या तीन शिकाऱ्यांना पकडले. त्यांची झडती घेण्यात आली, तेव्हा त्यांच्याकडे वाघाची नखे सापडली. तेव्हा क्राइम सेलने तिघांची सखोल चौकशी केली असता, त्या तिघांनी आणखी चौघांची नावे घेतली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, चिखलदरा तालुक्यातील आढाव गावात वन्यजीव विभागाच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत वन्य प्राण्यांची नखे, दात, खोरपडीचे चामडे, खवल्या मांजरीची खवले, सांबरचे शिंग जप्त करण्यात आले. तसेच या प्रकरणात आढाव गावातून चौघांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -'संयुक्त महाराष्ट्राच्या बाता मारता मग विदर्भाला सावत्रपणाची वागणूक का देता?'
हेही वाचा - अमरावती विद्यापीठाचा ऑनलाईन परीक्षेत गोंधळ, संप्तत विद्यार्थी धडकले विद्यापीठात