अमरावती - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. त्यानंतर अनलॉक महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालये सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, यासाठी दिवाळीनंतरचा मुहूर्त शिक्षणविभागाकाकडून काढला जाणार आहे. राज्यातील ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरू करणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंत्री बच्चू यांनी दिली आहे. कोरोना काळातील सर्व नियम अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचेही शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन आता टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येत आहे. राज्यातील आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने उद्योग, वाहतूक या सारख्या जवळपास सर्वच बाबी खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, मंदिरे आणि विद्यामंदिरे अजूनही बंद आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाईनच सुरू झाले आहे. मात्र, त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. ते अमरावतीत बोलत होते.
या शाळा सुरू करत असताना सरकारच्या वतीने एक चांगले धोरण आखण्यात येईल. या धोरणाच्या माध्यमातून कोणीही कोरोनाने बाधित होणार नाही आणि शिक्षणही व्यवस्थित दिले जाईल, अशा प्रकारची भूमिका सरकारने घेतली आहे. जर एखाद्या शिक्षकाचे वय ५० च्या पुढे असेल तर शिक्षकच्या ऐवजी दूसऱ्या शिक्षकाला तिथे घेता येईल का? तसेच बाधित मुले शाळेत येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करता येईल का? असाही विचार सुरू असल्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले.