अमरावती : समुद्राकाठची कला थेट सातपुड्याच्या टोकावर पाहायला मिळाली आहे. चिखलदरा येथे महाराष्ट्र पर्यटन संचालनाच्या वतीने खास मान्सून पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात वाळूशिल्प हे सर्वाधिक आकर्षण ठरले. हे वाळूशिल्प शिल्पकार विनायक निटुरकर यांनी साकारले आहे. या वाळूशिल्पातून त्यांनी मेळघाटातील जैवविविधता, चंद्रयान मोहिम तसेच गाविलगड किल्ला दर्शविण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे शिल्प महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले आहे.
शिल्पकार विनायक निटुरकर यांची प्रतिक्रिया : सुंदर अशा सोहळ्यात मला वाळूवर शिल्प साकारण्यास सांगण्यात आले. त्यानंतर माझे मित्र किल्लेदार प्रतिष्ठानचे विशाल देवकर यांनी वाळूमध्ये किल्ला साकारण्याचे प्रयोजन मला सुचवले. त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून वाळूमध्ये किल्ला साकारला, असे विनायक निटुरकर ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले. चिखलदरा येथील गाविलगड किल्ला या वाळूमध्ये दिसतो आहे. तसेच मेळघाटातील जंगलात असणारे प्राणी या वाळूमध्ये साकारण्यात आले. यामध्ये हत्ती अतिशय उठावदारपणे दिसतो आहे. यासोबतच भारताने नुकतीच चंद्रयान मोहीम यशस्वी केली, त्या चंद्रयान मोहिमेची कलाकृती देखील या वाळू शिल्पात साकारण्यात आली. एकूणच चिखलदरा मेळघाट येथील संस्कृतीसह देशाच्या विकासात महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या चंद्रयान मोहिमेची प्रतिकृती या वाळू शिल्पात असल्याचे विनायक निटुरकर म्हणाले.
'अशी' जोपासली कला : नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात विनायक निटुरकर हे सहाय्यक अभिरक्षक पदावर कार्यरत आहेत. लहानपणापासूनच त्यांनी शिल्पकला जोपासली आहे. माती कामातून सुरू झालेल्या या कलेतून फायबर आणि मेटलमध्ये देखील त्यांनी अनेक कलाकृती घडवल्या आहेत. खरंतर आपली नोकरी सांभाळत विनायक निटुरकर आपली कला सुद्धा जोपासतात. मध्यंतरी काही वर्ष ते कामानिमित्त रत्नागिरीला असताना त्यांनी वाळूशिल्प तयार करण्याची कलादेखील अवगत केली. विदर्भात मात्र त्यांनी पहिल्यांदाच वाळूमध्ये शिल्प घडवले आहे.
किल्लेदार प्रतिष्ठानची साथ : महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने चिखलदरा येथे आयोजित मान्सून पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने काहीतरी चांगले घडत आहे, ही आनंदाची बाब आहे. या ठिकाणी वाळू शिल्प घडवण्याची संधी मला मिळाली याचा अतिशय आनंद होत असल्याचे देखील विनायक निटुरकर म्हणाले. किल्लेदार प्रतिष्ठानच्या वतीने विदर्भात किल्ल्यांचे महत्त्व पटविण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचे किल्ले पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आहेत. या किल्ल्यांचे दर्शन विविध कलाकृतीद्वारे विदर्भातील लोकांना करून देण्याचा प्रयत्न हा किल्लेदार प्रतिष्ठानचा आहे. चिखलदरा येथे वाळू शिल्पामध्ये केवळ किल्लाच नव्हे, तर संपूर्ण मेळघाटचा उलगडा व्हावा, यासाठी विशाल देवकर यांची साथ मला लाभली, असे विनायक निटुरकर यांनी सांगितले.
हेही वाचा :