अमरावती - परतवाडा बसस्थानक परिसरामध्ये असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर आपली पंक्चर झालेली दुचाकी दुरुस्त करीत असताना अज्ञातांनी डिक्कीमधून चार लाख रूपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. सदर व्यक्ती सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांनी आपल्या मुलाच्या फ्लॅटच्या खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील स्टेट बँकेतून सुमारे चार लाख रूपये कॅश काढली होती. बँकेतून खाली उतरताच त्यांना तुमची दुचाकी पंक्चर झाली असल्याचे दोन अज्ञातांनी सांगितले. घटनेची फिर्याद परतवाडा पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मात्र चोरट्यांचा पत्ता लागला नाही.
पंक्चर झाल्याचे सांगून दिशाभूल
परतवाडा शरातील रहिवासी असलेले अशोक वानखडे यांच्या मोठ्या मुलाने घेतलेल्या फ्लॅटची खरेदी केली असल्याने अशोक वानखडे यांनी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील बँकेतून चार लाख रुपयांची रोकड काढली व ती स्कुटी गाडीच्या डिक्कीत ठेवली. दरम्यान मागावर असलेल्या दोन चोरट्यानी त्यांना तुमची गाडी पंक्चर असल्याचे सांगितले. तेथूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या एका दुकानात वानखडे गेले असता या चोरट्यांनी रक्कम लंपास केली.