अमरावती : शहरातील सर्वात जुने आणि अतिशय सुंदर असे पर्यटन केंद्र असणारा वडाळी तलाव आणि परिसराचा येत्या काही महिन्यात कायापालट होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खराब झालेल्या या तलावातील पाणी तलावाबाहेर काढून हा तलाव सध्या रिकामा केला जात आहे. अवघ्या सहा महिन्यानंतर वडाळी तलावाचा परिसर नव्या आणि आकर्षक रूपाने अमरावतीकरांसाठी खुला होणार आहे.
दुरूस्तीकरणासाठी निधी मंजूर : वडाळी तलावातील पाणी बाहेर काढणे, त्यानंतर तलावातील गाळ काढणे, तलाव परिसराला भिंत उभारणे यासह विविध कामांसाठी शासनाच्या वतीने एकूण 19.65 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी केंद्र शासनाच्या वतीने 33.33 टक्के निधी राहणार असून राज्य शासनाच्या वतीने 36.37 टक्के निधी मिळणार आहे. अमरावती महापालिका 30 टक्के निधी वडाळी तलावासाठी खर्च करणार असल्याची माहिती अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना दिली.
सहा महिन्यात काम पूर्ण : सहा महिन्यात तलावाचे काम पूर्ण होणार आहे. तलावालगत 3.28 हेक्टर जागेत पसरलेले अमरावती महापालिकेच्या उद्यानाचे सौंदर्यीकरण देखील केले जाणार आहे. या कामामुळे वडाळी तलावातील पाणी स्वच्छ होईल. हा परिसर सुंदर दिसेल आणि पर्यटकांना देखील या ठिकाणी यायला आवडेल, असे डॉ. प्रवीण आष्टीकर म्हणाले.
वडाळी तलावाचा इतिहास : अमरावती शहराच्या पूर्व आणि दक्षिण भागातील टेकड्यांवरून खाली वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडविण्यासाठी इंग्रज शासकांनी 1889 मध्ये वडाळी तलाव बांधला. हा तलाव बांधण्यापूर्वी या ठिकाणी वडाळी परिसरातील रहिवासी शेती करायचे. इंग्रजांनी तलाव बांधण्यासाठी या शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेऊन त्यांना त्या मोबदल्यात दुसरीकडे जमीन दिली. आज ज्या ठिकाणी वडाळी तलाव आहे तेथे पूर्वी शेतात असणाऱ्या एकूण सात विहिरी गाळामुळे दबून गेल्या आहेत.
इंग्रजांनी केली होती व्यवस्था : वडाळा तलावामागे फुटका तलाव आणि भवानी तलावाची निर्मिती 1899 मध्ये करण्यात आली. टेकड्यांवरून वाहत येणारे पाणी आधी भवानी तलावात आणि त्यानंतर फुटका तलावात वाहून येते. हे दोन्ही तलाव भरल्यावर या तलावा मधले पाणी वडाळी तलावात आणण्याची व्यवस्था देखील इंग्रजांनी करून ठेवली आहे. इंग्रज काळात शहरातील कॅम्प परिसरात वडाळी तलावातून पाणीपुरवठा केला जात असे. त्यासाठी तलावाच्या पायथ्याशी जलशुद्धीकरण यंत्रणेची निर्मीती करण्यात आली होती. विशेष म्हणजे तलावालगतच जलतरण तलाव देखील बांधण्यात आले. या ठिकाणी जी मुले पोहणे शिकत आहे, त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था देखील या जलतरण तलावामध्ये करण्यात आली होती. भव्य असा कारंजा देखील या ठिकाणी उभारण्यात आला होता. आज देखील जुने जलतरण तलाव वडाळी तलावालगत शाबूत आहे.
पहिल्यांदाच तलावाचे होते आहे काम : वडाळी तलाव दर वीस वर्षांनी आटतो. आता 2019 च्या उन्हाळ्यात हा तलाव पूर्णतः आटला होता. या तलावाच्या भरवशावरच तलावा लागत असणारे वडाळी गावठाण यासह दंत महाविद्यालय परिसर, तसेच लगतच्या राज्य राखीव पोलीस दल वसाहत परिसरातील विहिरींचे झरे अवलंबून आहेत. तलाव आटल्यावर या भागातील अनेक विहिरी कोरड्या पडतात. 2019 मध्ये परिसरातील नागरिकांसह काही राजकीय मंडळींनी या तलावातील गाळ काढण्याचा प्रयत्न केला होता. महापालिका प्रशासनाने देखील या तलावातील गाळ अधून मधून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या तलावाचे पूर्ण असे काम आता पहिल्यांदाच हाती घेतले जात आहे.
महात्मा गांधींनी दिली होती भेट : राष्ट्रपिता महात्मा गांधी हे वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम ला जात असताना त्यांनी 1932 साली वाटेत असणाऱ्या वडाळी तलावाला भेट दिली होती. त्यांच्या स्मृतीसाठी एक छोटेसे स्मारक वडाळी तलावावर उभारण्यात आले आहे.
वडाळी तलावासाठी दुरूस्तीची घोषणा : वडाळी तलावातील गाळ काढून या तलाव परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार, अशी घोषणा यापूर्वी गतवर्षी महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील झाली होती. तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी भेट घेऊन वडाळी तलावाचे सौंदर्यकरण करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी वडाळी तलावाच्या सौंदर्यकरणासह या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतळे बसविले जातील, असे घोषित केले होते. मात्र, या कामाला पुढे गतीच मिळाली नाही. आता मात्र वडाळी तलाव सौंदर्यकरणाची निविदा फेब्रुवारी महिन्यात काढून या तलावातील पाणी अतिशय गतीने बाहेर काढले जात आहे. तलावातील संपूर्ण पाणी आंबा नाल्यात वाहून जात आहे.
हेही वाचा : Nanded News: शेतकऱ्यानं माळरानावर फुलवले नंदनवन; यासाठी केला देशी जुगाड