अमरावती - एका ३५ वर्षीय कोरोनाग्रस्त युवकाचा मृतदेह कब्रस्थानात सोडून नातेवाईक पळून गेल्याची घटना अंजनगाव सुर्जी शहरात घडली. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते समी खान यांनी सांबांधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची तक्रार अंजनगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
अंजनगाव सुर्जी शहरातील सुर्जी भागातील डब्बीपुरा येथील एक ३५ वर्षीय तरुण कोरोनाबाधित झाला होता. त्याला अमरावती येथील कोवीड रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान १ जुलै रोजी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यासंबंधीची माहिती स्थानिक प्रशासनाने त्याच्या नातेवाईकांना दिली होती. रात्री उशिरा अमरावती येथील एका रुग्णवाहिकेत त्याचा मृतदेह अंजनगाव येथील कब्रस्थानात आणण्यात आला होता. यावेळी नगरपरिषद आरोग्य अधिकारी प्रदीप वाटाणे, सहाय्यक पोलीस अधिकारी विशाल पोळकर, सामाजिक कार्यकर्ते समीर खान, अजित भाई उपस्थित होते. यावेळी कब्रस्थानात फवारणीसुद्धा करण्यात आली. सदर कोरोनाबाधिताचा मृतदेह कब्रस्थानात ठेवून अमरावतीची रुग्णवाहिका निघून गेली. मृतदेह कब्रस्थानात जवळपास दोन तास पडून असल्याची माहिती समोर आली.
या प्रकरणात मृताचे नातेवाईकसुद्धा कब्रस्थानातून पळून गेले होते. अमरावती येथून अंजनगाव सुर्जीला कोरोनाग्रस्ताचा मृतदेह पाठवणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते समी खान यांनी केली आहे. विशेष म्हणजे सदर कोरोनाग्रस्ताचा मृतदेह कबर खोदणाऱ्यानी शेवटी पीपीई किट वापरून कबरमध्ये दफन केला.
दरम्यान, कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह अंजनगाव सुर्जीला आणण्यासाठी कोणत्या नातेवाईकांनी मागणी केली? सदर कोरोनाग्रस्त रुग्णाचे शव शासकीय कागदपत्रावर सही करून कोणत्या नातेवाईकांनी ताब्यात घेतले? असा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत आता अंजनगाव सुर्जी पोलीस तपास करीत आहेत.