अमरावती : दोन दिवसापूर्वी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री बडनेरा मतदार संघाचे आमदार रवि राणा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. संभाजीनगर येथील अर्जुन लोखंडे या तरुणाने मोबाईलवर फोन करून धमकी दिल्याचा उल्लेख दाखल झालेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. धमकी देणाऱ्या संबंधित तरुणाविरुद्ध राणा यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांनी स्थानिक राजापेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन धमकी देणाऱ्या अर्जुन लोखंडे या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात फिरणे बंद कर, नाहीतर संपवून टाकू : बडनेरा मतदार संघाचे आमदार रवि राणा यांना त्यांच्या मोबाईलवर संभाजीनगर येथील अर्जुन लोखंडे याने मोबाईल नंबरवरून धमकी दिली आहे. तू महाराष्ट्रभर फिरणे बंद कर, नाहीतर तुझ्या जीवाचे काहीतरी करून टाकु, अचानक काही घडलं किंवा अपघात झाला तर मग म्हणू नको. तुझ्यावर मी व माझे कार्यकर्ते लवकरच हमला करणार आहे. तुला आम्ही सोडणार नाही, तुझ्या अमरावती येथे येऊन तुला दाखवून देतो की आमच्या विरोधात कसा काय बोलतो तू. एवढ्या वेळेस थांबत नाही तर तुला संपवून टाकतो, या सारख्या जीवे मारण्याच्या धमक्या देऊन अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून करण्यात आला आहे.
आमदार रवी राणा यांच्या जीवितास धोका : आमदार रवि राणा यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून यासंबंधी त्यांच्या वतीने त्यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्याकडे रितसर लेखी तक्रार केलेली आहे. संबंधित तरुण अर्जुन लोखंडे संभाजीनगर या कार्यकर्त्यावर तातडीने कारवाई करावी व त्याला पकडून जेरबंद करावे, अशी मागणी या तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
रवि राणा उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये पोस्टर्स फाडल्यावरुन वाद : उद्धव ठाकरे यांनी विदर्भाच्या दौऱ्यात असताना रवि राणा आणि नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती. दौऱ्याच्या अगोदरच राणा समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पोस्टर्स झळकावले होते. हे पोस्टर्स उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फाडले होते. त्यामुळे अमरावतीत मोठी वाद निर्माण झाला होता. त्यातच उद्धव ठाकरेंचे बॅनरही राणा समर्थकांनी फाडल्याने अमरावतीत मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा -
- Hanuman chalisa Pathan In Amravati: राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा पठणला पोलिसांनी नाकारली परवानगी, 'हे' दिले कारण
- Thackeray Vs Rana : उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच राणा दाम्पत्याचे हनुमान चालिसा पठण, उबाठा आणि राणा समर्थकांनी एकमेकांचे पोस्टर फाडले
- Ravi Rana Targets Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणजे पावसाळी . . , विदर्भ दौऱ्यावरुन भाजप आमदाराची ठाकरेंवर टीका