अमरावती - विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात आज सकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे चिखलदाऱ्याचे निसर्ग सौंदर्य खुललेले आज पाहायला मिळाले. सध्या कोरोना विषाणूमुळे चिखलदऱ्याकडे पाठ फिरवली आहे. मात्र, दोन दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे चिखलदरामध्ये सकाळच्या सुमारास धुक्याची चादर पसरल्याचा नजारा पाहायला मिळाला. तसेच या ठिकाणी हवेत अल्हाददायक गारवाही निर्माण झाला आहे.
विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटातील चिखलदरामध्ये साधारणपणे ७ जूननंतर मुसळधार पावसाला सुरुवात होते. परंतु यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला आहे. त्याचाच परिणाम सध्या मेळघाटात दिसून येत आहे. बुधवारी आणि आज सकाळी सुद्धा चिखलदरा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. तसेच आज सकाळच्या सुमारास या ठिकाणी धुक्याची दाट चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.