अमरावती : देशाच्या एकता , अखंडता व धर्मनिरपेक्षतेला अधिक बळकटी मिळण्याला घेऊन काँग्रेसचे युवा नेता राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून सुरू केलेली भारत जोडो यात्रा सद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आली आहे. यात्रेला जागोजागी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून हिंगोली मार्गे भारत जोडो यात्रा अमरावती विभागातील वाशीममध्ये दाखल झाली आहे. दरम्यान १८ नोव्हेंबर रोजी शेगाव येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे.
राहुल गांधीची आमदार खोडकेंना विचारणा - यावेळी अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनी राहुल गांधी यांचे सहर्ष स्वागत केले. यावेळी राहुल गांधी यांनी खोडके यांना विचारत "कैसे हो ताईजी" असे उद्गार काढले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण महर्षी डॉ . पंजाबराब देशमुख, कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या विचारांनी पुनीत झालेल्या व पुरोगामी विवेकी विचार , सामाजिक समता व संत परंपरा जपणाऱ्या अमरावती विभागात "आपका स्वागत है", अशा शब्दात आमदार खोडके यांनी राहुल गांधी यांचे सहर्ष स्वागत केले.
नव्या परिवर्तनाची नांदी - भारत जोडो यात्रेत शेतकरी, कामगार, कष्टकरी, तसेच सर्वसमवेशक जनता व धर्मनिरपेक्ष विचारांची पक्ष व संघटना सहभागी झाल्याने देशाच्या एकता व अखंडतेला बळकटी मिळाली आहे. यानिमित्ताने काँग्रेसची ताकद दिसून येत असून ही नव्या परिवर्तनाची नांदी असल्याची शुभकामना आमदार सुलभाताई खोडके यांनी यावेळी व्यक्त केली. आपणही या यात्रेचा एक भाग बनून आपल्या हजारो समर्थकांसह एकजुटीने यात्रेत सामील होत असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
जात पात के बंधन तोडो , भारत जोडो - राहुलजी गांधी समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, आमदार सुलभाताई खोडके व पदाधिकारींनी जनतेला हात उंचावित अभिवादन करताच उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता . यावेळी "जात पात के बंधन तोडो , भारत जोडो -भारत जोडो" चा एकसूर निनादला होता . यावेळी राहुलजी गांधी यांच्या स्वागताकरिता मोठा जनसमुदाय देखील लोटला होता. खोडके यांच्या नेतृत्वात अमरावती मधून वाशीममध्ये दाखल झालेले हजारो समर्थक सुद्धा भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांचे समवेत चालत होते .
शेगाव येथे 18 नाेव्हेंबर राहुल गांधी यांची सभा - मंगळवार १५ नोव्हेंबर पासून अमरावती विभागातील वाशीम येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली ( Rahul Gandhi on November 18 at Shegaon ) असून पदयात्रा १५ ते १६ नोव्हेंबर दरम्यान वाशिम जिल्हा दोन दिवस , १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान अकोला येथे दोन दिवस आणि १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान बुलढाण्यातून ही यात्रा जाणार आहे. दरम्यान १८ नोव्हेंबर रोजी शेगाव येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडी मधील नेते व पदाधिकारी यांची विशेष उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांचा पदयात्रेत सहभाग - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच वरिष्ठ नेते, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मंत्री अशोकराव चव्हाण, जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अमरावती विभागातील भारत जोडो यात्रेची विशेष जबाबदारी आमदार खोडके यांच्यावर सोपविली असून त्यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात समर्थक वाशीममध्ये दाखल झाले आहे. भारतीयाच्या नव्या जडणघडणीचे शिलेदार होण्यासाठी व राहुल गांधी यांचे हात बळकट करून काँग्रेसची ताकद दाखवून देण्यासाठी अमरावती विभागातील भारत जोडो यात्रेत सर्व शेतकरी बांधव , कामगार , कष्टकरी, मजूर, महिला भगिनी , युवक बांधव तसेच सर्वसमावेशक जनता व धर्मनिरपेक्ष विचारांचे तमाम नागरिकांनी या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आमदार सुलभा खोडके यांनी केले आहे.