अमरावती -कोरोना काळात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शासनाच्या वतीने बँकिंगसेवेचे डिजिटलायजेशन झाले आहे. त्यामुळे ग्राहकांकडून बँकिंग व्यवहार ऑनलाइन करण्याला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, या बरोबरच सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्येही मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. या बाबींच्या अनुषंगाने ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. लोकांची ऑनलाइन फसवणूक होऊ नये याकरिता अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम शाखेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दरम्यान सायबर क्राईम सेलचे हे वाहन गावागावात जाऊन गावातील चौकात उभे केले जाते. यावेळी नागरिकही पोलिसांच्या या जनजागृती ला चांगला प्रतिसाद येत असल्याचे दिसून येत आहे. सायंकाळच्या वेळी गावच्या मोठ्या चौकात, बस स्थानकाजवळ, पाराजवळ हे वाहन उभे केले जाते आणि सायबर गुन्हेगारीसंदर्भात नागरिकांना सतर्क करत जनजागृती करण्याचे काम सध्या सायबर विभागाकडून सुरू आहे.