अमरावती - आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका शेतकऱ्याने अभिनव प्रयोग साकारला आहे. निरसणा गावातील अश्विन भेंडे यांनी 'टाकाऊ पासून टिकाऊ' प्रयोगाचा वापर करत आधुनिक कृषी यंत्र तयार केले आहे. अशा टिकाऊ वस्तू बनवलेले अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. अशाच प्रकारे शेतकरी अश्विन भेंडे यांनी दुचाकीवर चालणारे ६ प्रकारचे कृषी यंत्र तयार केलेलं आहे. आता २२ एकर शेतीच काम करण्यासाठी हे एकच यंत्र सज्ज झालंय.
घरात भंगारात पडलेली दुचाकी आज नवं रूप धारण करून शेताची मशागत करत आहे. ते सोयाबीन, तूर ,कापूस, आदींचे उत्पादन घेतात. मात्र वेळोवेळी मजूरांची कमतरता भासते तसेच ट्रॅक्टर घेणे महाग असल्याने त्यांनी कृषी यंत्राचा पर्याय शोधलाय.यंत्राद्वारे ते शेतात पेरणी, फवारणी, डवरणी, वखरणी, आदी कामे करत असल्याने त्यांचा वेळ व पैसा देखील वाचतोय.
अश्विन हे उच्चशिक्षित शेतकरी असून त्यांनी पदवी पर्यतचे शिक्षण झाले आहे. सोबतच आयटीआय देखील केल्याने आधीपासूनच त्यांना विविध प्रयोग करण्याची आवड आहे. त्यामुळे घरची शेती करण्यासाठी टाकाऊ पासून टिकाऊ यंत्राची निर्मिती करण्याच ठरवलं. यासाठी त्यांना सहा महिने लागले. तसेच ६५ हजारांचा खर्च आलाय.
या दुचाकीवर चालणाऱ्या फवारणी यंत्राने दोन एकर शेतात फवारणी करायला केवळ एक तास लागत असून फक्त एक लिटर पेट्रोलमध्ये हे काम शक्य होत असल्याने श्रम ,वेळ व पैसाही वाचत आहे. अश्विन यांनी तयार केलेलं हे यंत्र हे दुचाकीवर असल्याने शेतात चालवायला सोपं जातं.
१५० सीसीच्या दुचाकीवर साकारलेलं यंत्र हे आधुनिक शेती पद्धतीचा पाया भक्कम करतंय.