अमरावती - मूर्तिजापूर येथील एका महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी प्राचार्य डॉ. संतोष ठाकरेंविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ठाकरे यांनी महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी केली, असा आरोप या प्राध्यपकांनी केला आहे. तसेच, ठाकरे हे अतिशय अर्वाच्च भाषेत प्राध्यपकांना शिवीगाळ करतात, असे देखील प्राध्यपकांचा आरोप आहे. दरम्यान, याबाबत मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्यानंतरही पोलिसांकडून अद्याप कुठलीही हालचाल झालेली नाही.
आज पीडित प्राध्यापकांनी या विषयासंदर्भात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडेही तक्रार दिली. या संपूर्ण प्रकरणाबाबत पीडित प्राध्यापकांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या वेदना मांडल्या.
मागणी मान्य न केल्याने सातव्या वेतनापासून ठेवले वंचित
महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्राध्यापक असणाऱ्या महिलेला प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांनी थेट शरीर सुखाची मागणी केली. प्राध्यापिकेने यासंदर्भात संस्थेच्या सचिवांकडे तक्रार केली. मात्र, सचिवांनी, तुम्ही प्राचार्यांची माफी मागावी, असा सल्ला दिला. प्राचार्यांनी केलेली मागणी मी मान्य केली नसल्याने मला सातव्या वेतनापासून वंचित ठेवले, असा आरोप पीडित प्राध्यापिकेने केला आहे.
प्लेसमेंटसाठी मागितले दीड लाख रुपये
प्राध्यापकांचे प्लेसमेंट प्राचार्यांनी थांबवले आहे. प्लेसमेंटसाठी प्रत्येकाने दीड लाख रुपये मला द्यावेत, अशी मागणी प्राचार्यांनी केल्याचा आरोप पीडित प्राध्यापकांनी केला आहे. याबाबत संस्थाचालकांकडे तक्रार केली असता त्यांनी प्राचार्य म्हणतात तसेच करा, असे म्हटले असल्याचे पीडितांनी सांगितले.
प्राध्यापकांना शिवीगाळ
प्राचार्य संतोष ठाकरे हे शिवीगाळ करतात. आमच्या आई-पत्नीबाबत गैर शब्द वापरतात. त्यांचे वर्तन अत्यंत चुकीचे असल्याचे पीडित प्राध्यापकांनी सांगितले. विशेष म्हणजे, प्राचार्यांकडून केल्या जाणाऱ्या ऑडिओ क्लिप यावेळी पीडित प्राध्यापकांनी पत्रकारांना ऐकवल्या.
अकोल्याच्या पोलीस अधिक्षकांकडे करणार तक्रार
प्राध्यापक महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याबाबत मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असताना अद्याप कारवाई झाली नसल्याने आता आम्ही अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पीडित प्राध्यापकांनी सांगितले.
हेही वाचा - कौंडण्यपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वंचित आघाडीचे कार्यकर्ते दर्शासाठी दाखल