अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद पाळण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या निर्देनुसार अत्यावश्यक सेवेतील वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकानांकरता ठराविक वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र, काही व्यापारी या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्याने सदर दुकानांवर छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात सुरुवातीला लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसत होते. मात्र, आता शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचे अर्धे शटर उघडल्याने दुकानांसमोर गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातीलच एक संस्कृती कलेक्शन नामक दुकानाच्या मालकाने नियम मोडत दुकान उघडले होते. यावेळी पोलीस ठाणे व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या दुकानावर छापा टाकून कारवाई करत दुकान बंद करून दुकानदाराकडून दंड आकारण्यात आला. या घटनेनंतर इतर व्यापाऱ्यांनी धास्ती घेऊन आपली दुकाने पुर्णपणे बंद केली आहेत.