अमरावती - तिवसा शहरात नगरपंचायतच्या मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांना भाजीविक्रेत्याने शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर शहरात हातगाडी चालवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तिवसा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी व कर्मचारी शहरात नियमांचे उल्लंघन करूत हातगाडीवर भाजीपाला विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी भाजीपाला विक्रेत्याने मुख्याधिकारी यांना जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. तसेच एक महिला पोलीस अधिकारी व एका पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून मारहाण देखील करण्यात आली. हा प्रकार शहरातील बाजार ओळ येथे घडला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.
तिवसा शहरातील बाजार ओळमध्ये काही व्यवसायिक हातगाडीवर व्यवसाय करत असताना तिवसा मुख्याधिकारी पल्लवी सोटे व त्यांची चमू कारवाई करत होती. यावेळी श्रीधर ढोले या व्यवसायिकाने थेट मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांना अश्लिल शिवीगाळ केली. तसेच तुम्ही कारवाई करून शकत नाही, असे म्हणत नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच तिवसा येथील सहायक पोलीस निरीक्षक वर्षा वंजारी तेथे पोहोचल्या. त्यानंतर ढोले कुटुंबातील चार सदस्य तिथे आले व पोलिसांना शिवीगाळ केली.
आरोपी श्रीधर ढोले हा वर्षा वंजारी व पोलीस कर्मचारी किसन धुर्वे यांच्या अंगावर धावून गेला. त्याने धुर्वे यांची मान पकडत त्यांना मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. तसेच सहायक पोलीस निरीक्षक वर्षा वंजारी सुद्धा जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांनी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. श्रीधर तुकाराम ढोले, सुमित श्रीधर ढोले, मंगेश श्रीधर ढोले व वैष्णवी सुमित ढोले यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.