अमरावती - जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अमरावती शहर, अचलपूर व अन्य नऊ गावांमध्ये सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री आठपासून अमरावती शहर, अचलपूर व अन्य नऊ गावांमध्ये या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे.
वाहनांची विचारपूस
या लॉकडाऊनदरम्यान लोकांनी नियम तोडू नये, यासाठी अमरावती शहरात तब्बल 42 ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच ही 42 ठिकाणे वगळता अमरावती शहराला जोडणाऱ्या मुख्य काही मार्गांवर पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. जे लोक अमरावतीमध्ये प्रवेश करतात त्या लोकांची, त्यांच्या वाहनांची विचारपूसही पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. जर कोणी कामानिमित्त अमरावतीत येत असेल तर त्यांना सोडले जात आहे. परंतु विनाकारण विनामास्क अमरावतीत येत असेल तर त्यांच्यावर पोलीस कारवाईदेखील होत आहे.
प्रशासनासमोर नवीन आव्हाने
मागील काही दिवसांपासून अमरावतीमध्ये कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सध्या अमरावतीत सात दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. काल अमरावती जिल्ह्यामध्ये तब्बल 926 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एका वर्षात एवढे कोरोनाबाधित रुग्ण केव्हाच न निघाल्याने नसल्याने जिल्हा प्रशासनासमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे मास्क लावा, कोरोना नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवेला मुभा
अमरावती महानगरपालिकेच्या वतीनेदेखील शहरामध्ये पाच पथके तैनात करण्यात आली आहेत. जबाबदार नागरिकांवर कारवाई केली जात आहे. सात दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेला मुभा देण्यात आली आहे, परंतु सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत ही अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.