अमरावती - प्राचार्य आणि विभाग प्रमुखांच्या मानसिक त्रासाविरोधात आंदोलन करणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी भाजप युवा मोर्चा आणि एनएसयुआयच्या पदाधिकाऱ्यांसह प्रचार्यांच्या दालनात गोंधळ घालणे तीन विद्यार्थ्यांना चांगलेच भोवले आहे. प्राचार्यांच्या तक्रारीवरून तीन विद्यार्थ्यांसह एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष संकेत कुलट यांच्याविरोधात गडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
हेमंत तिवारी, अक्षय जयसिंगपूर आणि अभिषेक दाभाडे अशी अटक केलेल्या विद्यार्थांची नावे आहेत. प्राचार्य डॉ. विवेक वेदा आणी विभाग प्रमुख निल्स सुरेश हे विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करतात. अनेकदा अपशब्द वापरतात. पालकांना बोलावून त्यांचाही अपमान करतात. या दोघांच्या त्रासाला कंटाळून एखादा विद्यार्थी जिवाचे बरे वाईट करू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री याबाबत गडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. प्राचार्यांच्या दालनासमोर ठिय्या देऊन विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान आधी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण रुद्रकार आणि एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष संकेत कुलट कार्यकर्त्यांसह महाविद्यालयात पोहचले. रुद्रकार आणि कुलट यांच्या नेतृत्वात काही विद्यार्थी प्रचार्यांशी चर्चा करण्यासाठी प्रचार्यांच्या दालनात गेले असता काही वेळातच प्रचार्यांसोबत वाद होऊन विद्यार्थ्यांनी कार्यालयाची तोडफोड केली.
या प्रकरणात प्राचार्यांनी गडगेनगर पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी हेमंत तिवारी, आकाश जयसिंगपूर आणि अभिषेक धाबडे यांना अटक केली. या प्रकरणाच्या चौकशीत सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर पोलिसांनी रात्री एनएसयुआयचे जिल्हा प्रमुख संकेत कुलट यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.