अमरावती - परतवाडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भरसभेत जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी काळे झेंडे दाखवले. याप्रकरणी पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रमुख मनोज चव्हाण यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे. त्यामुळे चिडलेल्या प्रकल्पग्रस्तांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून अटक करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्तांना सोडण्याची मागणी केली आहे.
अमरावती लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत आले होते. परतवाडा येथील नेहरू मैदानावर आयोजित सभेत मुख्यमंत्री भाषण करण्यासाठी मंचावर उभे होताच, जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. यावेळी सभा स्थळावर प्रकल्पग्रस्त आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
तेव्हा पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रमुख मनोज चव्हाण यांच्यासह ५ जणांना अटक केली. या प्रकारानंतर प्रकपग्रस्तांनी परतवाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत अटक करण्यात आलेले मनोज चव्हाण यांच्यासह इतरांना त्वरित सोडा, अशी मागणी केली. वर्षभरापासून आम्ही न्याय मागत आहोत. मात्र, सरकार दखल घेत नसल्याचा आरोपही यावेळी प्रकल्पग्रस्तांनी केला.