अमरावती - जिल्ह्यात मोजकीच दारूची दुकाने सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी छुप्या पध्दतीने दारूची वाहतुक सुरू आहे. यासाठी दारुविक्रेते निरनिराळ्या शक्कल लढवताना दिसत आहे. 2 दिवसापूर्वी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलिसांनी भाजीपाल्याच्या गाडीतून दारूची तस्करी करणारांवर कोरवाई केली होती. आता पुन्हा चांदूर रेल्वे येथे महिलेचा आधार घेऊन दुचाकीवरून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अमरावती शहरामध्ये दारूची दुकाने बंद असल्यामुळे मद्यपींचा कल चांदूर रेल्वे शहराकडे जास्त आहे. मात्र, पोलीस कठोरपणे तपासणी करीत असून अमरावतीकरांना प्रवेश नाकारत आहेत. असे असतानाही दारू वाहतूक करणारे निरनिराळ्या युक्त्या वापरत आहेत. अशातच अमरावतीमधील प्रबुद्ध नगरात राहणारे आरोपी अमोल बापूराव रामटेके व त्यांची पत्नी हे दोघे दुचाकीवर चांदूर रेल्वेतून मोठ्या प्रमाणात दारू घेऊन अमरावतीकडे निघाले होते. त्यांना अमरावती मार्गावरील नाकाबंदीच्या ठिकाणी थांबवण्यात आले. त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली असता महिलेजवळ असलेल्या बॅगमध्ये व गाडीच्या डिक्कीत एकुण ४३ विदेशी दारूच्या बॉटल्स आढळून आल्या. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.