अमरावती - मराठी भाषेची शुद्धीकरण मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात राबवली होती. आजची मराठीत इंग्रजी भाषेचा वापर होत आहे. मराठी संस्कृती टिकवण्यासाठी आपली भाषा जगवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कवी प्रा. डॉ. विठ्ठल वाघ यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर संस्कृतीक भवन येथे मराठी भाषा गौरव दिन कर्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
आपले मन आपली संस्कृती आहे. प्रमाण मराठीचा मायकोश वऱ्हाडी आहे. मराठीतला आद्यग्रंथ लिळाचरित्र वऱ्हाडी भाषेत लिहिला गेला. वऱ्हाडी भाषेत माधूर्य आहे. भाषा आणि संस्कृती या वेगळ्या करता येत नाही. मराठी टिकवण्यासाठी मराठी भाषा जाणीवपूर्वक बोलली आणि वाचली पाहिजे असेही डॉ. विठ्ठल वाघ म्हणाले. यावेळी कुलगुरू डॉ. मुरलीधार चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, प्रभारी कुलसचिव डॉ. हेमंत देशमुख, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक कळंबे आदी उपस्थित होते.