अमरावती - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यात संचारबंदी लागू केली होती. या संचारबंदीच्या काळात लहान मोठे सगळेच उद्योग-धंदे आणि दुकाने बंद करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी मद्याची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. संचारबंदीमुळे कुठल्याही प्रकारची मजुरी नसल्याने महिलांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात आता दारू विक्री सुरू झाल्याने महिलांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. त्यामुळे फुबगाव येथील संतप्त महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
दारू विक्री सुरू झाल्याने नवरे घरातील वस्तू विकून दारू पीत आहेत. विचारणा केली असता, महिलांना मारहाणही करत आहेत. गावामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे फुबगाव येथील महिला बचत गटांनी नांदगांव खंडेश्वर येथील पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर व नायब तहसीलदार चेतन मोरे यांना निवेदनाद्वारे तक्रार दिली.
अवैधरीत्या दारू विक्री करणार्यांवर लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा गावातील सर्व महिला बचत गट एकत्रित येऊन दारू विक्री करू. आम्हाला सुद्धा दारू विक्री करण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी या महिला बचत गटांच्यावतीने नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली.