अमरावती- बडनेरा मतदार संघात जी कामे मंजूरच झाली नाही अशा कामांचे भूमिपूजन आमदार रवी राणा करीत आहे. शहरातील अनेक प्रभागात जी कामे नगरसेवकांनी खेचून आणली त्या कामांचेही भूमिपूजन करण्याचा सपाटा आमदार रवी राणा यांनी लावला आहे. आमदार राणा यांची लबाडी आता जनतेला कळली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त होणार, असे भाकीत भाजपचे नगरसेवक तुषार भारतीय यांनी केले आहे.
आमदार रवी राणा यांच्या खोटारडेपणा विरोधात भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि नगरसेवक तुषार भारतीय यांनी आज पत्रकार परिषद घेतली. अमरावती महापालिकेच्या वतीने शहरात अनेक भागात रस्त्यांचे, उद्यानांचे काम होत आहे. ही कामे प्रभागातील नगरसेवकांच्या प्रयत्नाने होत असताना अशा कामांचे भूमिपूजन आमदार रवी राणा हे आपल्या मर्जीने करून त्या कामांचे श्रेय घेत आहे.
बडनेरा मतदारसंघात येणाऱ्या अंजनगाव बारी या गावात पाच महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरू झाले होते. आज ५० टक्क्यांच्यावर काम पूर्ण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी या कामाचे भूमिपूजन सोहळा आयोजित केला होता. मात्र ग्रामस्थांनी त्यांना हा काय मूर्खपणा आहे? असा सवाल करीत त्यांना गावातून पिटाळून लावले, असे तुषार भारतीय यांनी सांगितले.
आमदार रवी राणा यांना जनता घरी बसवणार
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बडनेरा मतदार संघातील जनता आमदार रवी राणा यांना घरी बसवणार आहे. राणा यांचा खोटारडेपणाला जनता कंटाळली आहे. जे काम एक ते दीड कोटी रुपयांची आहे, ती कामे आठ कोटी रुपयांचे असल्याची खोटी माहिती देणारे फलक आमदार राणा यांच्याकडून मतदारसंघात लावले जाते.
शहरातील अतिशय महत्त्वाच्या पालखी मार्गावरील भूतेश्वर चौक ते साईनगर दरम्यानचे काम होत आहे. ते माझ्या प्रयत्नाने होत असताना या कामाचे श्रेय लुटण्याचा प्रकारही आमदार राणा यांनी केला. आता आमदार राणा यांचा लबाडपणा जनतेला ठाऊक झाला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार रवी राणा यांचे डिपॉझिट निश्चितपणे जप्त होणार, असेही तुषार भारतीय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला नगरसेवक अजय सारसकर, चेतन गावंडे, रेखा भुतडा, स्वाती कुलकर्णी, राधा कुरील, सुनंदा खरड आदी उपस्थित होते.