अमरावती - जिल्ह्यातील तिवसा येथील रतनगीर महाराज परिसरात ३३केव्ही विजेच्या तारा लोकवस्तीतून नागरिकांच्या घरावरून गेलेल्या आहेत. आज सोमवारी सकाळी या परिसरात 53 वर्षीय सुभाष लिल्लारे यांना विजेच्या तारांचा धक्का लागल्याने ते गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे या संतप्त नागरिकांनी वस्तीतील वीज तारा हटवण्यासाठी आज तिवसा वीज वितरण कार्यालयावर धडक देत कार्यालयाच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
सुभाष लिल्लारे हे छतावर पाण्याची टाकी धुण्यासाठी गेले असता त्यांच्या घरावरून गेलेल्या 33 केव्ही उच्च दाबाच्या वीज तारेला त्यांचा स्पर्श झाला. यात लिल्लारे हे गंभीररित्या भाजले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ते ७० टक्के भाजले गेले असून मृत्यूशी झुंज देत आहेत. या परिसरात वीज तारा नागरिकांच्या घरावरून गेल्या असून त्या धोकादायक आहेत. यापूर्वी या तारेला स्पर्श झाल्याने ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
या विज तारा या ठिकाणाहून हटविण्याची मागणी करण्यासाठी या रतनगीर महाराज परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांच्या नेतृत्वात तिवसा वीज वितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त नागरिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. तर, कार्यालयाच्या इमारतीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले. याप्रकरणी वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता वसुले यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा करत निवेदन सादर केले.